मुलगा पुण्यात-आईवडील मुंबईत अन् चोरटे घरात, डीव्हीआर उडवत ८.४९ लाखांची घरफोडी
By योगेश पांडे | Updated: September 11, 2023 14:50 IST2023-09-11T14:46:39+5:302023-09-11T14:50:28+5:30
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

मुलगा पुण्यात-आईवडील मुंबईत अन् चोरटे घरात, डीव्हीआर उडवत ८.४९ लाखांची घरफोडी
नागपूर : घरातील मुलगा कामानिमित्त पुण्याला गेला अन् आईवडील मुंबईत मुलीकडे गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घर फोडत ८.४९ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरटे जाताना सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील घेऊन गेले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
पियुष राजहंस लाडे (४०, मॉडेल टाऊन, इंदोरा) हे १ सप्टेंबर रोजी कामानिमित्त पुणे येथे गेले होते. तर त्यांचे आईवडील मुलीकडे गेले होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचे चॅनेल कुलूप तोडून आत प्रवेश केला. पियूष तसेच आईवडिलांच्या बेडरूममधील कपाटांमधून सोन्याचांदीचे दागिने, घड्याळ व रोख २.७४ लाख असा ८.४९ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. कुठलीही ओळख पटू नये यासाठी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज रेकॉर्ड करणारा डीव्हीआरदेखील चोरून नेला. घरी परत आल्यावर लाडे यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.