गाडी सुटायच्या काही मिनिटं आधी 'तो' प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडला अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 21:35 IST2019-09-16T21:13:29+5:302019-09-16T21:35:09+5:30
प्लॅटफार्ममध्ये अडकलेल्या मुलाला सुखरुप बाहेर काढल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.

गाडी सुटायच्या काही मिनिटं आधी 'तो' प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडला अन्...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : त्रिवेंद्रम एक्स्प्रेसमधून उतरताना एक सात वर्षांचा मुलगा रेल्वेगाडी आणि प्लॅटफार्ममध्ये असलेल्या जागेत पडला. थोड्याच वेळात गाडी सुरु होणार होती. मुलाच्या आईवडिलांनी घाबरून रडायला सुरुवात केली. परंतु रेल्वेस्थानकावरील कुली मदतीला धावले. त्यांनी गाडी सुरु होण्यापूर्वी प्लॅटफार्ममध्ये अडकलेल्या मुलाला सुखरुप बाहेर काढल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.
गोरखपूर-त्रिवेंद्रम एक्स्प्रेस सकाळी ७.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. या गाडीच्या बी २ कोचमधून उतरताना एक सात वर्षांचा मुलगा प्लॅटफॉर्म व गाडी यांच्या मध्ये असलेल्या अरुंद जागेत पडला. तो पडताच प्रवाशांनी आरडाओरड सुरु केली. गाडी सुरु झाल्यास मुलाच्या चिंधड्या उडतील या भितीने सर्वांना काळजी वाटली. मुलाचे आई-वडिल रडायला लागले. त्यावेळी रेल्वेस्थानकावर उपस्थित कुली अब्दुल माजिद आणि प्रेमसिंग मीना यांनी गाडीकडे धाव घेतली. त्यांनी प्लॅटफार्म आणि गाडीच्या मध्ये अडकलेल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. गाडी सुरु झाल्यास मुलाला वाचविणे शक्य होणार नाही, हा विचार करून कुली अब्दुल माजिद यांनी एका कुलीला लोकोपायलटला गाडी थांबविण्यासाठी पाठविले. त्यानंतर गाडीच्या दुसऱ्या बाजुने जाऊन त्यांनी मुलाला सुखरुप बाहेर काढले. यात मुलाच्या पायाला थोडी दुखापत झाली. मुलगा सुखरुप बाहेर निघताच आईवडिलांनी मुलाला कवटाळून धरले. प्लॅटफार्मवर उपस्थित प्रवाशांनी कुलींनी दाखविलेल्या समयसुचकतेबद्दल आणि मुलाचा जीव वाचविल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.