ब्लड कॅन्सरवर बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट प्रभावी उपचार पद्धत

By Admin | Updated: May 31, 2016 02:42 IST2016-05-31T02:42:56+5:302016-05-31T02:42:56+5:30

‘ल्युकेमिया’, अर्थात रक्ताचा किंवा अस्थिमज्जेचा कर्करोग. या आजाराचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. मात्र

Bone marrow transplant effective treatment method on blood cancer | ब्लड कॅन्सरवर बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट प्रभावी उपचार पद्धत

ब्लड कॅन्सरवर बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट प्रभावी उपचार पद्धत

नागपूर : ‘ल्युकेमिया’, अर्थात रक्ताचा किंवा अस्थिमज्जेचा कर्करोग. या आजाराचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. मात्र रक्ताच्या कर्करोगाचा थोडा संबंध किरणोत्सर्जन (अणुंपासून निघालेल्या किरणाचा वापर) काही प्रकारचे रसायन व काही औषधे यांच्याशी आहे. पण बऱ्याच रुग्णांमध्ये असे कोणतेही कारण दिसून येत नाही. याचा एक प्रकार ‘अ‍ॅक्युट लिम्पोब्लास्टिक ल्युकेमिया’ (एएलएल) आहे. जो विशेषकरून लहान मुलांना होतो. ‘अ‍ॅक्युट मेलॉईड ल्युकेमिया’ (एएमएल) हा दुसऱ्या प्रकारचा रक्ताचा कर्करोग उशिरा वयात येतो. या रोगावर ‘बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट’ ही प्रभावी उपचार पद्धत आहे, अशी माहिती ग्लोबल हॉस्पिटल्सचे हिमॅटोलॉजी आणि बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट विभागाचे प्रमुख डॉ. सचिन जाधव यांनी दिली.
‘लोकमत’ला दिलेल्या शुभेच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते. डॉ. जाधव म्हणाले, अस्थीतील मज्जापोकळी भरतो तो पदार्थ म्हणजे ‘बोनमॅरो’ यात कर्करोगाच्या पेशी शिरल्यास रक्ताचा कर्करोग होतो म्हणूनच याला ‘बोनमॅरो कॅन्सर’ असेही म्हटल्या जाते. अस्थीच्या याच मज्जापोकळीत रक्त तयार होते. या रक्तात ‘रेड सेल’, ‘व्हाईट सेल’ आणि ‘प्लेटलेट’ असतात. येथे कॅन्सरच्या पेशींचा शिरकाव झाल्यास हे तिन्ही रक्त घटक कमी व्हायला लागतात. ‘रेड सेल’ कमी झाल्याने हिमोग्लोबिन कमी होते. यामुळे थकवा निर्माण होतो. ‘व्हाईट सेल’ कमी झाल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन संक्रमण (इन्फेक्शन) होते. सर्दी, खोकला, ताप व न्यूमोनिया हे आजार होतात. परंतु ‘ल्युकेमिया’च्या रुग्णांमध्ये हे आजार लवकर बरे होत नाही. शरीरातील आतील आणि बाहेरचे जंतू ‘अटॅक’ करीत असल्याने रुग्णाची स्थिती गंभीर होण्याची शक्यता असते. ‘प्लेटलेट’ कमी झाल्याने रक्तस्राव होतो. नाक, हिरड्या, लघवीतून रक्त येते. महिलांना अचानक मासिकपाळीत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी स्वस्थ असलेला व्यक्ती या आजारामुळे अचानक गंभीर होतो. रक्ताच्या कर्करोगाचा रुग्ण सकाळी स्वस्थ आणि सायंकाळी आयसीसीयूमध्येही असू शकतो. इतक्या झपाट्याने त्याच्या शरीरात बदल होतात.(प्रतिनिधी)
‘ल्युकेमिया’च्या वेगवेगळ्या प्रकारात ९० टक्के रुग्ण बरे होतात
काही डॉक्टरांना या रोगाचे विशेष ज्ञान नसल्याने रुग्णांना सर्रास अ‍ॅन्टीबायोटिक औषधे देतात. यामुळे रुग्णाची प्रकृती आणखी गंभीर होते. अनेक वेळा रुग्णांना आवश्यक औषधोपचार मिळत नसल्याने त्यांची स्थिती केमोथेरपी घेण्याचीही राहत नाही. ल्युकेमियाचे तत्काळ निदान झाल्यास, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारातील ९० टक्के रुग्ण बरे होऊ शकतात.
असे होते ‘बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट’
‘बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट’ हा जुना शब्द झाला आहे. आता स्टेमसेल ट्रान्सप्लान्ट म्हटले जाते. शरीरात बोनमॅरो स्टेमसेलला ‘हिमॅटोपायोटिक’ स्टेमसेलही म्हटले जाते. हे स्टेमसेल निरोगी व्यक्तीच्या रक्तामधून वेगळे करून रुग्णांना दिले जाते. या स्टेमसेलमुळेच रेडसेल, व्हाईटसेल व प्लेटलेट नव्याने तयार होतात. ट्रान्सप्लान्टपूर्वी हायडोज केमोथेरपी दिली जाते. ही थेरपी हाडाच्या आतील कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यास मदत करते. काही रुग्णांना रेडिएशनसुद्धा दिले जाते. ट्रान्सप्लान्टचा सक्सेस रेट रुग्णाच्या आरोग्यावर अवलंबून असतो. परंतु सरारसरी ६० ते ७० टक्के याचा सक्सेस रेट आहे.


आरोग्य विमा असणे आवश्यक आहे
बदलत्या जीवनशैलीचा निश्चितच आरोग्यावर प्रभाव पडत आहे. औषधे व इस्पितळाचा खर्चही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. यामुळे प्रत्येकाचा आरोग्य विमा असणे आवश्यक झाले आहे. याचा फायदा कठीणसमयी नक्कीच होतो, असेही डॉ. जाधव म्हणाले.

Web Title: Bone marrow transplant effective treatment method on blood cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.