बॉम्बशोधक पथकातील हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:51 IST2020-08-29T00:50:00+5:302020-08-29T00:51:05+5:30
शहर पोलिस दलात बॉम्बशोधक व नाशक पथकात (बीडीडीएस) कार्यरत असलेले पोलीस हवालदार तूलसिंग धनसिंग चव्हाण (वय ५३) यांचा गुरुवारी रात्री हृदयविकारामुळे मृत्यू झाला.

बॉम्बशोधक पथकातील हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलिस दलात बॉम्बशोधक व नाशक पथकात (बीडीडीएस) कार्यरत असलेले पोलीस हवालदार तूलसिंग धनसिंग चव्हाण (वय ५३) यांचा गुरुवारी रात्री हृदयविकारामुळे मृत्यू झाला. चव्हाण गेल्या चार वर्षांपासून बीडीएसमध्ये सेवारत होते. गुरुवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. नंतर शोल्डर दुखू लागले. त्यामुळे त्यांनी मुख्यालयातील पोलिस इस्पितळात संपर्क साधला. डॉक्टरांनी त्यांना अॅम्बुलन्स उपलब्ध करून तातडीने मेयो किंवा मेडिकलमध्ये जाण्यास सांगितले. चव्हाण मेयो चौकात पोहोचले आणि त्यांनी तिथे एका मेडिकल स्टोअर्समधून अॅसिडिटीच्या गोळ्या घेतल्या. दरम्यान, चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यांना अॅम्बुलन्स चालकाने मेयो इस्पितळात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिस दलात खळबळ
तीन दिवसात पोलीस दलात कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे. पोलीस आयुक्तालय कार्यालयातील सुरज पंचभाई नामक पोलीस कर्मचारी आणि गुरुवारी सुरेश पाल नामक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हे दोघे कोरोनामुळे दगावले. तर चव्हाण यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. गिट्टीखदान पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरु आहे.