लॉकडाऊनचा फटका; अखेर नेत्रबाधित विद्यार्थिनी पोहोचली घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 07:31 PM2020-04-18T19:31:59+5:302020-04-18T19:32:31+5:30

नांदेड येथील किनवटची नेत्रबाधित विद्यार्थिनीही एकटीच नागपुरात अडकली होती. अखेर महत्प्रयासांनी ती नागपूरपासून ३५० किमी लांब असलेल्या आपल्या गावी सुखरूप पोहोचली आहे.

The blind student finally reached home | लॉकडाऊनचा फटका; अखेर नेत्रबाधित विद्यार्थिनी पोहोचली घरी

लॉकडाऊनचा फटका; अखेर नेत्रबाधित विद्यार्थिनी पोहोचली घरी

Next
ठळक मुद्देदहावीचा पेपर रद्द झाला तेव्हापासून गंगासागर अडकली होती नागपुरात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या प्रकोपामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनचा फटका गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बसला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्याने आणि उपचारासाठी बाहेर गेलेले तेथेच अडकून पडल्याच्या विविध घटना उघडकीस येत आहेत. त्याच श्रुंखलेत नांदेड येथील किनवटची नेत्रबाधित विद्यार्थिनीही एकटीच नागपुरात अडकली होती. अखेर महत्प्रयासांनी ती नागपूरपासून ३५० किमी लांब असलेल्या आपल्या गावी सुखरूप पोहोचली आहे.
किनवटची राहणारी गंगासागर खंडारे ही नेत्रबाधिक विद्यार्थिनी नागपूरच्या दी ब्लाईण्ड रिलिफ असोसिएशनद्वारा संचालिक अंध विद्यालयात शिकते. तिची दहावीची परीक्षा सुरू असतानाच कोरोनाने महाराष्ट्रात पाय पसारण्यास सुरुवात केली. २३ मार्च रोजी तिचा भूगोल विषयाचा पेपर होता आणि दरम्यान महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू झाल्याने इतर वर्गांच्या परीक्षांसह दहावीची परीक्षाही स्थगित किंवा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. त्याअनुषंगाने भूगोलाचा पेपर रद्द झाला. लॉकडाऊनमुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आणि वाहतूक व्यवस्थाही स्थगित करण्यात आली. याच दरम्यान काही कामानिमित्त तिचे वडील एका गावी तर भाऊ व वहिनी दुसऱ्या गावी अडकून पडले आणि किनवट येथील घरात गंगासागरची आई एकटीच होती. अशा परिस्थितीत नागपुरात असलेल्या गंगासागरला कसे आणायचे हा प्रश्न आई, वडील व भावाच्या मनात निर्माण झाला. पेपर रद्द झाल्याने गंगासागर अंध विद्यालयाच्या वसतीगृहात सुखरूप होती, हे विशेष. मात्र, किती काळ एकटेच राहणार.. हा प्रश्न गंगासागरच्या मनात खिळला आणि तिने घरी नेऊन सोडण्याची विनंती वसतीगृह प्रशासनाकडे केली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून संस्थेने तिला घरी पोहोचविण्याचे आव्हान स्विकारले. पोलीस उपायुक्त विवेक मसाळ यांचे वाचक व उपनिरिक्षक कैलास कुथे यांनी परवानगीचे पत्र दिले. त्यानंतर नागपूर ते किनवट असा ३५० किलोमिटरचा प्रवास गंगासागरने केला आणि गुरुवारी संध्याकाळी ती आपल्या गावी पोहोचली. यावेळी तिच्या या प्रवासात काळजीवाहक म्हणून संस्थेचे अरुण चौरसिया व अनंत खानखोजे होते. संस्थेच्या प्रयत्नाने व पोलीसांच्या सहकार्याने नेत्रबाधिक गंगासागर आपल्या घरी सुखरूप पोहोचली.

आईने दिली पाच हजाराची देणगी
स्थितीचे गांभीर्य ओळखून आणि आपली मुलगी सुखरूप घरी पोहोचल्याच्या आनंदात गंगासागरच्या आईने संस्था व पोलीसांचे आभार मानले. यावेळी त्यांनी सामाजिक दायित्त्व समजून पाच हजार रुपयाची देणगी काळजीवाहकांच्या हाती सोपवली. नको म्हणताच आईने आग्रह केल्याने ही देणगी स्विकारावी लागली. त्यांची भावना समजून घेऊन संस्थेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे यांनी मातोश्रीचे आभार मानले.

Web Title: The blind student finally reached home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.