नागपूरमध्ये भाजपचे दिग्गज चेहरे असलेल्या माजी नगरसेविका प्रगती पाटील, बंडू राऊत व प्रमोद चिखले यांना त्यांच्याच पक्षातील तगड्या बंडखोरांनी घेरले आहे. तिकीट कटल्याच्या नाराजीतून सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण, विनायक डेहनकर यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटत आव्हान उभे केले आहे. त्यामुळे भाजपच्या या दिग्गजांना आता विरोधी उमेदवारांसोबतच स्वकीयांशीही दोन हात करावे लागणार आहे.
गेल्यावेळी प्रभाग १४ मधून भाजपकडून प्रगती पाटील विजयी झाल्या होत्या. तर निवडणुकीनंतर सुनील अग्रवाल यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळाली होती. यावेळी आरक्षण सोडतीत सर्वसाधारण संवर्गासाठी एकच जागा सुटली.
नाराज अग्रवालांची बंडखोरी
या जागेवर पाटील व अग्रवाल दोघांनीही दावा केला. शेवटी प्रगती पाटील यांनी तिकीट मिळविण्यात बाजी मारली. यामुळे नाराज होऊन सुनील अग्रवाल यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून अर्ज भरला.
अग्रवाल यांना भाजपकडून समजविण्याचे प्रयत्न झाले, पण ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे ते निवडणूक लढण्यावर ठाम राहिले. येथे काँग्रेसने शहर प्रवक्ते अभिजित झा यांच्या रूपात नवा युवा चेहरा दिला आहे.
'पाटील यांना बंडखोरीचा फटका बसणार नाही'
अग्रवाल यांनी मोठ्या प्रमाणात भाजपचे मत विभाजन केले, तर प्रगती पाटील यांना नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, प्रगती पाटील यांचे सामाजिक काम मोठे असल्याने त्यांना बंडखोरीचा फटका बसणार नाही, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महालातील वाडा असलेल्या प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजपने माजी नगरसेवक बंडू राऊत व कार्यकर्ते धीरज चव्हाण या दोघांनी एबी फॉर्म दिले होते. डबल एबी फॉर्मचा घोळ या प्रभागात चांगलाच गाजला.
शेवटी चव्हाण यांचा एबी फॉर्म बाद झाला. पण, अपक्ष म्हणून त्यांनी दंड थोपटले. गेल्या निवडणुकीत बंडू राऊत यांना भाजपने तिकीट दिले होते. पण, त्यांना काँग्रेसचे बंटी शेळके यांनी पराभूत केले होते. यावेळी राऊत यांना आपल्याच पक्षातील चव्हाण यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.
डेहनकर यांच्या चमत्काराकडे लक्ष
प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजपने माजी नगरसेवक प्रमोद चिखले यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज होत माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले. डेहनकर यांच्या बंडखोरीची शहरभर जोरात चर्चा आहे.
विशेष म्हणजे, पतीची बंडखोरी पत्नीला आवडलेली नाही. त्यामुळे अर्चना डेहनकर या निवडणूक संपेपर्यंत आपल्या भावाकडे मुक्कामी गेल्या आहेत. तर विनायकराव यांनीही पत्नीने भाजपचे काम करावे, मी माझे काम करतो अशी सुट देत अप्रत्यक्षपणे आक्रमकपणे लढण्याचा इरादा जाहीर केला आहे.
येथे काँग्रेसने गेल्यावेळी बसपाकडून लढलेल्या तृप्ती मानवटकर यांचे पती सुहास मानवटकर यांना 'हात' दिला. येथे भाजप- काँग्रेसच्या लढतीपेक्षा डेहनकर काय चमत्कार करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Nagpur BJP faces internal strife as ticket denials spark rebellion. Aggarwal, Chavan, and Dehenkar challenge party veterans, dividing votes and creating tough contests. All eyes on the poll results.
Web Summary : नागपुर भाजपा में टिकट बंटवारे से असंतोष। अग्रवाल, चव्हाण, और डेहनकर ने दिग्गज नेताओं को चुनौती दी, जिससे वोट विभाजन और कड़ी प्रतिस्पर्धा हुई। सबकी निगाहें चुनाव नतीजों पर।