भाजपचे राज्यात दीड कोटी सदस्य नोंदणीचे टार्गेट, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या संघटनपर्वाला सुरुवात

By योगेश पांडे | Updated: January 5, 2025 16:29 IST2025-01-05T16:29:04+5:302025-01-05T16:29:12+5:30

कार्यकर्त्यांनी जनता-सरकारमधील सेतू बनावे

BJP's target of registering 1.5 crore members in the state, BJP's organization festival begins in the presence of the Chief Minister | भाजपचे राज्यात दीड कोटी सदस्य नोंदणीचे टार्गेट, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या संघटनपर्वाला सुरुवात

भाजपचे राज्यात दीड कोटी सदस्य नोंदणीचे टार्गेट, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या संघटनपर्वाला सुरुवात

नागपूर : राज्यात निवडणूक जिंकल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचे काम संपलेले नाही. उलट पक्ष व कार्यकर्त्यांवरील जबाबदारी वाढली आहे. आता कार्यकर्त्यांनी लोकाभिमुख होऊन काम करावे व जनता-सरकारमधील सेतू बनावे. सोबतच पक्ष विस्तारावर भर देत भाजपचे राज्यातील दीड कोटी सदस्य नोंदणीचे टार्गेट पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपुरात भाजपच्या संघटनपर्वाला सुरुवात झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमादरम्यान रविवारी ते बोलत होते.

रेशीमबाग येथील महात्मा फुले सभागृहात आयोजित कार्यक्रमादरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ.कृष्णा खोपडे, आ.मोहन मते, आ.प्रवीण दटके, संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, शहराध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, संजय भेंडे, अश्विनी जिचकार प्रमुख्याने उपस्थित होते. २०१४ साली अमित शहा भाजपचे अध्यक्ष झाले होते तेव्हा त्यांनी पक्षाला जगातील सर्वात मोठा पक्ष बनविण्याचे टार्गेट ठेवले होते. चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे ८ कोटी सदस्य होते. आपण ११ कोटी सदस्य केले व भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष झाला. मात्र येथे थांबायचे नाही. एकट्या महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य करण्यात येईल असा दावा प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय कार्यकारिणीसमोर केला आहे. डिजिटल नोंदणीमुळे हे काम अधिक सोपे झाले आहे. डिजिटल नोंदणीमुळे कार्यकर्त्यांचे संपर्क नंबर पक्षाकडे नोंदवला जातो व त्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे त्यांच्यापर्यंत पोहचवणे शक्य होते. त्यादृष्टीने सर्वांनी काम करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांनी केले २५ सदस्य
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनीदेखील त्यांच्या रेफरल कोडचा वापर करत २५ जणांना भाजपचे सदस्य केले. देशात २३०० हून अधिक पक्ष आहेत. मात्र भाजप व भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोडले तर इतर सर्व कुठल्या तरी कुटुंबाचे पक्ष आहेत. कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर भाजपच लोकशाहीवर चालणारा पक्ष उरला आहे, असा दावा फडणवीस यांनी केला. यावेळी त्यांच्या हस्ते बुथपातळीवर उत्तमप्रकारे नोंदणी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

नागपुरात सात लाखांचे उद्दीष्ट्य

जनतेचा आशीर्वाद टिकवायचा असेल तर लोकाभिमुखता कायम ठेवावी लागेल.लोकप्रतिनिधींनी यावर भर दिला पाहिजे. नागपुरात सात लाख नवीन सदस्य जोडण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. जे टार्गेट सांगणार ते पूर्ण झालेच पाहिजे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Web Title: BJP's target of registering 1.5 crore members in the state, BJP's organization festival begins in the presence of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.