नागपुरात भाजपचा चौकार की काँग्रेसचा करिश्मा? फडणवीस, गडकरींच्या विकासाचा झंझावात

By गणेश हुड | Updated: December 20, 2025 10:00 IST2025-12-20T10:00:27+5:302025-12-20T10:00:46+5:30

दोन्ही शिवसेना व राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी धडपड

BJP's four-pronged approach or Congress' charisma in Nagpur? Fadnavis, Gadkari's development storm | नागपुरात भाजपचा चौकार की काँग्रेसचा करिश्मा? फडणवीस, गडकरींच्या विकासाचा झंझावात

नागपुरात भाजपचा चौकार की काँग्रेसचा करिश्मा? फडणवीस, गडकरींच्या विकासाचा झंझावात

गणेश हुड 
लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 'होम पिच' असणाऱ्या उपराजधानीत सलग चौथ्यांदा विजयाचा निर्धार भाजपने केला आहे. नागपूर महापालिकेतील तब्बल १२० जागांवर भाजपचा झेंडा फडकेल, असा ठाम दावा महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. शहरातील विकासकामांच्या बळावर हे गणित त्यांनी मांडले आहे.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी यंदा महापालिकेत 'करिश्मा' घडेल, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या जोरदार लढतीमुळे काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे. शहरात भव्य प्रकल्प उभे राहत असले, तरी बेरोजगारी, पाणीटंचाई, अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था, घराघरांतून नियमित कचरा न उचलला जाणे आणि तुंबणाऱ्या गटार लाईनमुळे त्रस्त झालेले नागरिक यावेळी परिवर्तनाला पसंती देतील, असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे.

भाजप स्वबळावर लढण्यास सज्ज आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहता महायुती होण्याची शक्यता कमीच दिसते. काँग्रेसमध्येही इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि उद्धव सेनेची ताकद विभागली गेली आहे. त्यामुळे आठ-दहा जागांवर आघाडी झाली तर ठीक, अन्यथा स्वबळावरच मैदानात उतरण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली आहे.

नागपुरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव मर्यादित आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक निवडून आला होता. काही प्रभागांत पक्षाला चांगली मते मिळाली प्रभागांत पक्षाला चांगली मते मिळाली मिळवण्याइतकी ताकद नाही. मनपातील माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे काँग्रेसमधून अजित पवारांकडे गेले असले, तरी त्यांचा प्रभाव त्यांच्या प्रभागापुरताच मर्यादित असल्याचे चित्र आहे. शिवसेनेची स्थितीही तशीच आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आले होते आणि ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. सेनेची ताकद विभागली गेली असली, तरी काही प्रभागांत ठाकरे गटाचा प्रभाव अद्याप कायम आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा तितका प्रभाव शहरात दिसून येत नाही.

एकूण प्रभाग किती आहेत? ३८
एकूण सदस्य संख्या किती? १५१

प्रशासकराज संपणार

महापालिकेची मुदत ४ मार्च २०२२ रोजी संपली. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे लांबणीवर पडल्या. निवडणुका कथी होणार याची उत्सुकता लोकांना लागली होती. अखेर साडेतीन वर्षानंतर निवडणुका होत असल्याने मनपातील प्रशासकराज संपणार आहे. लोकप्रतिनिधींच्या हातात पुन्हा एकदा कारभार येणार असल्याने नागरिकांना मूलभूत प्रश्न, विकासकामे आणि दैनंदिन समस्या मांडताना येणाऱ्या अडचणी कमी होतील.

२०१७ चे संख्याबळ

भाजप - १०८
काँग्रेस - २९
बसपा - १०
राष्ट्रवादी - १ 
शिवसेना - २ 
अपक्ष - १

वाढलेल्या मतदारसंख्येचा लाभ कुणाला मिळणार?

या निवडणुकीत नागपुरात ३,८९,७२० मतदार वाढले आहेत. ही वाढ सर्वच समाजातील असून, संपूर्ण १५१ मतदारसंघांत विभागलेली आहे. २०१७च्या निवडणुकीत २०,९३,३९२ मतदार होते. आता ही संख्या २४,८३,११२ इतकी झाली आहे. यात प्रामुख्याने युवकांचा समावेश आहे. वाढलेले मतदार कौल कुणाला देतात, यावर निकाल फिरण्याची शक्यता आहे.

बसपाने १० जिंकल्या होत्या, आता 'उत्तर'चा गड राखणार?

माजी मंत्री व आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या तुलनेत बसपाचे नगरसेवक संख्याबळाने अधिक असतात. मागील निवडणुकीत बसपाचे १०, तर काँग्रेसचे ७ नगरसेवक निवडून आले होते. उत्तर नागपुरातील एक-दोन प्रभागांत मुस्लिम लीगचेही काही प्रमाणात वर्चस्व आहे. त्यामुळे यंदा बसपा आपला बालेकिल्ला राखते की, काँग्रेस आपले संख्याबळ वाढवते, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे कोणते ?

भाजपचे संघटन मजबूत असले तरी माजी नगरसेवकांविषयी लोकांमध्ये नाराजी आहे. माजींना नाकारून नवीन चेहऱ्यांना संधी दिली, तर याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मतविभाजन टळले तर काँग्रेस तगडी फाइट देऊ शकते.

काँग्रेससाठी नागपूर म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे. मात्र, शहरात सध्या संघटन मजबूत नाही. निवडणुकीत काँग्रेस एकसंध राहात नाही. एमआयएम, बसपा व वंचितच्या उमेदवारांनी अधिक मते घेतली तर काँग्रेसला फटका बसतो. २०१२च्या तुलनेत २०१७मध्ये नगरसेवकांची संख्या कमी झाली होती. सध्या काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखतीचे नियोजन सुरू आहे.

मागील निवडणुकीत एकूण मतदार किती ?

एकूण - २०,९३,३९२
पुरुष - १०,७०,९२८
महिला - १०,२२,४०१
इतर - ६३ 

आता एकूण किती मतदार ?

एकूण -२४,८३,११२
पुरुष - १२,२६,६९०
महिला - १२,५६,१६६
इतर - २५६

मतविभाजनाचा फायदा कुणाला?

वंचित बहुजन आघाडी यंदा प्रथमच नागपूर महापालिका निवडणुकीला सामोरी जाण्याच्या तयारीत आहे. वंचित समोर विजयाचे आव्हान सोपे नसले, तरी काही प्रभागात ते इतर पक्षांचे गणित बिघडवू शकतात.

त्याचप्रमाणे एमआयएमही उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. वंचित आणि एमआयएमच्या मतविभाजनाचा फटका काही प्रभागांत काँग्रेस व बसपाला बसू शकतो, असे झाल्यास त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे.

Web Title: BJP's four-pronged approach or Congress' charisma in Nagpur? Fadnavis, Gadkari's development storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.