भाजप महापालिकांच्या उमेदवारीसाठी राबवणार नवा पॅटर्न, रणनीती ठरली
By यदू जोशी | Updated: December 11, 2025 08:58 IST2025-12-11T08:53:48+5:302025-12-11T08:58:01+5:30
ए प्लस जागांवर पक्षनिष्ठांना संधी देणार : व्यक्तीकेंद्रित नव्हे, तर चिन्हकेंद्रित प्रचाराला प्राधान्य

भाजप महापालिकांच्या उमेदवारीसाठी राबवणार नवा पॅटर्न, रणनीती ठरली
यदु जोशी
नागपूर : नगर परिषद निवडणुकीत अनेक भागांमध्ये भाजपच्या आमदार, खासदारांनी वा बाहेरून आलेल्या प्रभारी आणि इतर काही जणांनी उमेदवारी वाटपापासून निवडणूक रणनीती निश्चित करण्यापर्यंत काहीशी मनमानी केल्याचे लक्षात आल्यानंतर आता महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी आणि रणनीतीचा नवा पॅटर्न आणला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीची एक बैठक दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी भाजपच्या विदर्भ विभागीय कार्यालयात तीन तास घेतली. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, माजी मंत्री डॉ. संजय कुटे आदी या बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक शहरातील पाच-सहा प्रमुख नेत्यांना बैठकीला बोलविले होते.
नगर परिषद निवडणुकीतील तिकीट वाटपाच्या पद्धतीबाबत काही जणांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. वर्षानुवर्षे पक्षात काम करणाऱ्या अनुभवी नेत्यांची मते जाणून न घेता सगळे वर ठरले असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीत दिले हे निर्देश
उमेदवार निश्चित करताना भाजप आणि संघ परिवारातील स्थानिक प्रमुख व्यक्तींची मते जाणून घ्या.
केवळ निवडक चारपाच नेते उमेदवार ठरवतील असे होणार नाही. स्थानिक सगळ्या नेत्यांना एकत्र बसवा, त्यांची मते घ्या आणि सर्वसंमतीने उमेदवार ठरवा. आपसात संवाद वाढवा. उमेदवार ठरविण्याची सर्वसंमतीची पूर्वीची पद्धतच वापरा. घरोघरी संपर्क अभियान सुरू करा.
जे नव्याने ट्रिपल इंजिन सरकार आणा, महापालिकेत स्लोगन बनवा ते लोकप्रिय करा. घरोघरी संपर्क अभियान सुरू होणार. नेते, आमदाराच्या नाही तर चिन्हावर न्या, कॉर्नर सभा, बूथ सभा, छोट्या सभा, प्रभाग सभा, सामाजिक संपर्क व्यक्तिकेंद्रित न करता चिन्हकेंद्रित करा म्हणजे फटका बसणार नाही.
पैशांची उधळपट्टी तातडीने थांबवा
प्रभारी, आमदार, खासदार आणि प्रदेश स्तरावरून उमेदवारीपासून बहुतेक निर्णय झाले. त्याचा फटका निकालात बसू शकेल, या शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्याची माहिती आहे.
त्यावर शिवप्रकाश यांनी कडक शब्दात पुढील दिशा सांगितली. निवडणुकीत पैशांची उधळपट्टी, बटबटीतपणा टाळा. लहान - लहान जातींना सोबत घेण्याची रणनीती ठरवा, त्याची फारशी चर्चा न करता अंमलबजावणी करा.
कोणत्याही एका नेत्याच्या नावावर वा त्याला केंद्रित करून प्रचाराचे नियोजन करू नका. पक्षाचे चिन्ह कमळ; त्यावर फोकस करूनच लढा, असे बजावण्यात आले. प्रत्येक विभागासाठी अशा बैठका होणार आहेत.
बैठकीत काय - काय कानमंत्र देण्यात आले...?
भाजपच्या दृष्टीने निवडून येण्याची शंभर टक्के खात्री (ए किंवा ए प्लस) असलेल्या प्रभागात पक्षाप्रति सुरुवातीपासूनच एकनिष्ठ असलेल्या तरुण उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. त्यामुळे हमखास जिंकणार असलेल्या जागांवर आयात उमेदवार लादला जाणार नाही.