मोदींच्या दौऱ्यानिमित्त ४७ चौकांमध्ये भाजप करणार शक्तीप्रदर्शन स्वागत नियोजनाची बैठक

By योगेश पांडे | Updated: March 27, 2025 21:53 IST2025-03-27T21:52:20+5:302025-03-27T21:53:13+5:30

गुढीपाडव्याला शहराचे चौक सजविणार

BJP to hold reception planning meeting for power show at 47 chowks on Modi's visit | मोदींच्या दौऱ्यानिमित्त ४७ चौकांमध्ये भाजप करणार शक्तीप्रदर्शन स्वागत नियोजनाची बैठक

मोदींच्या दौऱ्यानिमित्त ४७ चौकांमध्ये भाजप करणार शक्तीप्रदर्शन स्वागत नियोजनाची बैठक

योगेश पांडे - नागपूर

नागपूर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूर दौरा असल्याने भारतीय जनता पक्षाकडून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. या दौऱ्यानिमित्त भाजपकडून शहरातील विविध चौक सजविण्यात येणार आहेत. तसेच ४७ चौकांमध्ये भाजप कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन दाखविणार आहेत. कडेकोट सुरक्षाव्यवस्था असल्याने पंतप्रधान नेमके किती शहर पदाधिकाऱ्यांना भेटणार हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही.

पंतप्रधान ३० मार्च रोजी माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त नागपूरला येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ते थेट रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसराकडे रवाना होतील. तेथून ते दीक्षाभूमीला जातील व त्यानंतर माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमात पोहोचतील. तेथून ते सोलार एक्सप्लोजिव्हला भेट देणार आहेत.

सुमारे चार तास पंतप्रधान नागपुरात राहणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने स्वागत तयारीबाबत भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महाल येथील शिक्षक सहकारी बॅंकेच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, विदर्भ संघटक डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपा नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, आ. प्रवीण दटके, आ. संदीप जोशी, आ. चरणसिंग ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते. मोदी ज्या मार्गावरून जातील तेथे तसेच शहरातील ४७ चौकांमध्ये कार्यकर्त्यांना एकत्रित आणून त्यांचे स्वागत करण्याची सूचना देण्यात आली.

गुढीपाडव्याचा दिवस असल्याने वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा, चौकात सजावट, स्वागताचे फलक तसेच गुढी उभारून पंतप्रधानांचे स्वागत करा, अशी सूचना बावनकुळे यांनी केली. या बैठकीला माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार विकास कुंभारे, माजी आमदार राजू पारवे, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, विष्णू चांगदे, माजी महापौर अर्चना डेहनकर, डॉ. राजीव पोतदार, जयप्रकाश गुप्ता हेदेखील उपस्थित होते.

Web Title: BJP to hold reception planning meeting for power show at 47 chowks on Modi's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.