भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्रच लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 20:06 IST2018-06-16T19:54:52+5:302018-06-16T20:06:53+5:30
२०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युती दिसणार नाही, असे बोलले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे अनेकदा जाहीरसुद्धा केले आहे. असे असले तरी येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक कार्यकर्ता या नात्याने व्यक्त केला.

भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्रच लढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युती दिसणार नाही, असे बोलले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे अनेकदा जाहीरसुद्धा केले आहे. असे असले तरी येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक कार्यकर्ता या नात्याने व्यक्त केला.
वनभवन सभागृहात आयोजित बैठकीसाठी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी त्यांना शिवसेना व भाजपातील भांडणाबाबत विचारणा केली असता मुनगंटीवार म्हणाले, सरकार म्हणून शिवसेना- भाजपासोबतच आहे. त्यांचा कुठलाही त्रास नाही. येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर त्याला अजून खूप वेळ आहे. राजकारणात तासात परिस्थिती बदलत असते. केवळ सत्ता आणि घराणेशाही टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊ शकते तर मग एकाच विचारांनी प्रेरित पक्ष का एकत्र येऊ शकत नाही. भाजपा-शिवसेना हे एकाच विचारांचे आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येतील, असा मला भाजपाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून विश्वास असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
एचएमटी तांदळाचे जनक दिवंगत दादाजी खोब्रागडे यांना पाच कोटीची मदत भाजपा सरकार करू शकली नसल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच केली. यासंदर्भात मुनगंटीवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, हे वक्तव्य म्हणजे या शतकातील सर्वात मोठा जोक आहे. दादाजींचे संशोधन हे काही आजकालचे नाही. अनेक वर्षांपासूनच आहेत. तेव्हा राज्यात काँग्रेसचेच सरकार होते, त्यांनी तेव्हा दादाजींना मदत का केली नाही? असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.
पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार
येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.