पालकमंत्री नितीन राऊतांच्या घरासमोर मध्यरात्री भाजयुमोचे आंदोलन, निषेधाची रांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 16:47 IST2022-01-17T16:23:33+5:302022-01-17T16:47:44+5:30
नागपुरात भाजयुमोतर्फे रविवारी मध्यरात्रीनंतर चक्क पालकमंत्री नितीन राऊत यांच्या घरासमोर निषेधाची रांगोळी काढत आंदोलन करण्यात आले.

पालकमंत्री नितीन राऊतांच्या घरासमोर मध्यरात्री भाजयुमोचे आंदोलन, निषेधाची रांगोळी
नागपूर : राज्य शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक पारित झाल्यानंतर भाजपतर्फे विरोध वाढतो आहे. नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे रविवारी मध्यरात्रीनंतर चक्क पालकमंत्री नितीन राऊत यांच्या घरासमोर निषेधाची रांगोळी काढत आंदोलन करण्यात आले.
भाजयुमोच्या युवती विभागाच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. महाविकास आघाडीच्या विरोधात भाजयुमो विविध पद्धतीने आंदोलन करत आहे. मागील आठवड्यातच मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठविण्यात आले होते. आता पालकमंत्री तसेच महाविकास आघाडीच्या आमदार-खासदारांच्या घरासमोर आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे. याअंतर्गतच रविवारी मध्यरात्रीनंतर पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर भाजयुमोचे कार्यकर्ते एकत्रित आले. यावेळी भाजयुमो शहराध्यक्ष पारेंद्र पटले प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी रांगोळी रेखाटत कायद्यातील सुधारणांचा विरोध केला. हे कायदे विद्यापीठांचा राजकीय आखाडा करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप लावण्यात आला.
विधेयक वापस घेण्याकरीता महाविकास आघाडीने त्वरित पावले उचलली नाहीत, तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पटले यांनी दिला. यावेळी सारंग कदम, भक्ती आमटे, राखी मानवटकर, सपना तावडे दीपांशु लिंगायत, सचिन करारे, सनी राऊत, सचिन सावरकर, अक्षय ठवकर, अथर्व त्रिवेदी, गोविंदा, देव यादव, अनिकेत ढोले, संदीपन शुक्ला, रोहित व प्रसाद मुजुमदार, मॉन्टी पिल्लारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.