भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, शिक्षक घोटाळ्यात एसआयटी स्थापन करा
By योगेश पांडे | Updated: April 20, 2025 23:45 IST2025-04-20T23:45:26+5:302025-04-20T23:45:49+5:30
यासंदर्भात विधानपरिषदेचे आमदार संदीप जोशी व मध्य नागपुरचे आमदार प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.

भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, शिक्षक घोटाळ्यात एसआयटी स्थापन करा
नागपूर : संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या मुख्याध्यापक नियुक्ती तसेच शालार्थ शिक्षण आयडी घोटाळ्यात एसआयटी स्थापन करा अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे. यासंदर्भात विधानपरिषदेचे आमदार संदीप जोशी व मध्य नागपुरचे आमदार प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.
जोशी व दटके यांनी रविवारी नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट गेतली. शिक्षण विभागात शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये गंभीर गैरप्रकार, अपारदर्शक निर्णय व नियमबाह्य नेमणुकीचे प्रकार समोर आले आहेत. या प्रक्रियेमुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होत असून, खासगी संस्थांच्या माध्यमातून शिक्षण उपसंचालक व अन्य कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बनावट शाळांना मान्यता दिली गेली आहे. सदर प्रकार अत्यंत गंभीर असून, शिक्षण क्षेत्रातील विश्वासाला तडा लावणारा आहे. या प्रकरणात विशेष तपास पथक स्थापन करून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
पटोलेंची मागणी, न्यायाधीशांमार्फत व्हावी चौकशी
दरम्यान, कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र एसआयटी गठीत करण्यास विरोध केला आहे. या शिक्षण घोटाळ्याची चौकशी एसआयटी नव्हे तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. शासनाच्या जवळ असलेल्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना अनेक शाळा-महाविद्यालये देण्यात आली आहेत. आता या घोटाळ्यात प्रशासनाकडे अंगुलीनिर्देश होत असला तरी यात शासनकर्तेदेखील तेवढेच दोषी आहेत. त्यामुळेच चौकशी ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत व्हावी अशी भूमिका पटोले यांनी मांडली.