भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 06:40 IST2025-12-13T06:39:56+5:302025-12-13T06:40:18+5:30
ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही, मंत्र्यांचा खुलासा

भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
नागपूर : भाजप आमदार कृष्णा खोपडे व प्रवीण दटके यांनी स्मार्ट सिटी प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप केलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चिट मिळाली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) व पोलिस अशा दोन एजन्सींनी चौकशी केली आहे. त्यांनी त्यांच्या अहवालात चुकीचे काहीच आढळले नसल्याचे नमूद करीत क्लीन चीट दिली आहे, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केले. महिला आयोगाकडे एक चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल महिनाभरात येईल व त्यानुसार पुढील कारवाई करू, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
भाजपचे आ. कृष्णा खोपडे व आ. प्रवीण दटके यांनी नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी अधिकार नसताना स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अंदाजे २० कोटींच्यावर गैरव्यवहार केल्याची तक्रार लक्षवेधी सूचना मांडत केली. त्यावेळेसचे महापौर, सत्तापक्षाचे नेते यांनी सर्व कागदपत्रांसहीत सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला. पोलिस विभागातर्फे या प्रकरणी कार्यवाही झाली नाही.
मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पामधील दोन महिला अधिकाऱ्यांना स्वतःच्या कार्यालयात बोलावून अभद्र व्यवहार केला. या महिला अधिकाऱ्यांनी सदर पोलिसात तक्रार केल्याने मुंढेंवर गुन्हा दाखल झाला, असे सांगत आ. खोपडे यांनी मुंढे यांना तातडीने बडतर्फ करून मुख्य सचिव व पोलिस महासंचालकामार्फत चौकशी करण्याची मागणी लावून धरली. यावर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, मुंडे यांच्या सीईओ म्हणून नियुक्तीला तत्कालीन आयुक्तांनी मंजुरी दिली होती. केलेल्या कामांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कार्योत्तर मंजुरी दिली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांची सहीदेखील आहे.
२० कोटींच्या बिलाबाबत ईओडब्ल्यू व पोलिसांमार्फत दोन चौकशी सुरू होत्या. मुंढे यांनी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करून काही केले असे दिसत नाही. योग्य प्रक्रिया राबवूनच बिल काढले होते. कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही, असा अहवाल देत ईओडब्ल्यू व पोलिस या दोन्ही एजन्सींनी त्यांना क्लीन चीट दिली आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. आ. दटके यांच्या मागणीची दखल घेत दोन्ही एजन्सीचे चौकशी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवले जातील, असेही त्यांनी आश्वस्त केले.
वडेट्टीवारांचे भाजप आमदारांना चिमटे
मुंढे यांना मंत्र्यांनी क्लीन चीट दिल्यानंतर आ. विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदारांना चिमटे काढले. ते म्हणाले, मंत्री म्हणतात चौकशी झाली, निर्दोष आढळले. आता हे प्रकरण एकदाचे ईडी, सीबीआयकडे पाठवून द्या. स्पेशल फोर्स नेमा. तेव्हा तुमचे समाधान होईल. आमदार बॉल टाकताहेत, मंत्री टोलवताहेत. एकदाचा सोक्षमोक्ष करा, असे टोले वडेट्टीवारांनी लगावले. विशेष म्हणजे गुरुवारी विधानसभेत हा विषय आला असता वडेट्टीवारांनी मुंढे यांची बाजू घेतली होती.