भाजपचे माजी आमदार रामदास आंबटकर यांचे निधन
By योगेश पांडे | Updated: April 30, 2025 16:10 IST2025-04-30T15:39:36+5:302025-04-30T16:10:22+5:30
भाजप-अभाविप वर्तुळात शोककळा : विदर्भात संघटन वाढविण्यात मौलिक योगदान

BJP MLA Ramdas Ambatkar passes away
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानपरिषदेचे भाजपचे माजी आमदार डॉ.रामदास आंबटकर (६४) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. चेन्नई येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी अनेक वर्ष जुळले होते. ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या निधनामुळे भाजप व अभाविप वर्तुळात शोककळा पसरली आहे.
मागील काही दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. त्यातच त्यांना न्युमोनियाचे निदान झाले. त्यांच्यावर अगोदर नागपुरातील एका खाजगी इस्पितळात उपचार सुरू होते व त्यानंतर त्यांना चेन्नई येथील महात्मा गांधी मेडिकल मिशन हेल्थकेअर सेंटर येथे त्यांना हलविण्यात आले होते. बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. रामदास आंबटकर यांचा जन्म १ जुलै १९६० रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील वडनेर या छोट्याशा गावात झाला. लहानपणापासूनच ते संघाचे स्वयंसेवक होते. १९७९ मध्ये यवतमाळमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता झाले. त्यानंतर अभाविप यवतमाळ शहर सरचिटणीस, विस्तारक आणि अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. त्यानंतर अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, विदर्भ प्रदेश संघटन सचिव म्हणूनदेखील त्यांनी जबाबदारी सांभाळली. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट तसेच व्यवस्थापन परिषद सदस्यदेखील होते. २००४ मध्ये त्यांनी राजकीय क्षेत्रात काम सुरू केले. २०१५ मध्ये त्यांना भाजप महाराष्ट्राचे सरचिटणीस बनवण्यात आले.
गडकरींनी व्यक्त केला शोक
"डॉ.आंबटकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. विदर्भात भाजप आणि अभाविपचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी मौलिक परिश्रम केले होते. विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी नेहमी आवाज उचलला होता. कुशल संघटक आणि विचारधारेप्रति समर्पित असलेल्या डॉ.आंबटकर यांच्या निधनामुळे विदर्भातील सामाजिक-राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे."
- नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री