तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी का करतो? भाजप आमदार कृष्णा खोपडेंना फोनवरून शिवीगाळ व धमकी
By योगेश पांडे | Updated: December 9, 2025 00:13 IST2025-12-09T00:13:14+5:302025-12-09T00:13:53+5:30
खोपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे.

तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी का करतो? भाजप आमदार कृष्णा खोपडेंना फोनवरून शिवीगाळ व धमकी
नागपूर : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजपच्या नागपुरातील आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करत विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात येण्याची भूमिका घेणारे आमदार कृष्णा खोपडे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धमकीचे फोन आले. तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी का करत असल्याचा सवाल करत दोन जणांनी शिवीगाळ करत धमकी दिल्याचा दावा खोपडे यांनी केला आहे. यासंदर्भात खोपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. तसेच सिताबर्डी पोलीस ठाण्यातदेखील तक्रार केली आहे.
खोपडे यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर सरकारने कारवाई करावी असा आग्रह धरला आहे. तक्रारीनुसार अधिवेशनाच्या पहिल्याच खोपडे विधानभवनात प्रवेश करत असताना त्यांना ९६०४२४८९९४ व ९६२०३०३००५ या दोन क्रमांकांवरून फोन आले. समोरील व्यक्तींनी तुम्ही तुकाराम मुंढे यांच्याविरोधात का बोलत आहात असे म्हणत शिवीगाळ केली व खोपडे यांना पाहून घेण्याची धमकी दिली. मुंढे यांच्याविरोधात २०२० मध्ये स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराविरोधात पोलीस तक्रार केली होती. माहिती आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विधानसभेत लक्षवेधी दाखल केली आहे. त्यामुळे मला ही धमकी देण्यात आल्याचा दावा खोपडे यांनी केला आहे. ९६०४२४८९९४ या क्रमांकावरून खोपडे यांना दुपारी १२.१२ वाजता फोन आला तर ९६२०३०३००५ या क्रमांकावरून त्यांना सातत्याने पंधरा वेळा फोन आले. खोपडे यांनी सिताबर्डी पोलीस ठाण्यातदेखील तक्रार केली आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना नागपुरातीलच आमदाराला अशा प्रकारे धमकी आल्याने पोलीस यंत्रणेतदेखील खळबळ उडाली आहे.