लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिका निवडणुकीअगोदर कुठल्याही प्रकारची बंडाळी होऊ नये, यासाठी भाजपने सावध पावले उचलत यादी जाहीर करण्याचे टाळले. भाजपकडून प्रत्येक प्रभागातून मोठ्या प्रमाणावर सक्षम दावेदार होते. उमेदवारांच्या निवडीसाठी सखोल प्रक्रिया राबविण्यात आली असली, तरी शहरातील सहा जागांवर पक्षाला शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम उमेदवार निश्चित करता आला नाही. त्यामुळेच सहा जागांवर दोन उमेदवारांना 'एबी' फॉर्म देण्यात आले व आता त्यातील नेमके कोणते उमेदवार अर्ज मागे घेणार याबाबत विविध चर्चाना उधाण आले आहे. भाजपने सोमवारी उमेदवारांना थेट फोन करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात बोलविण्यात आले.
तेथे कागदपत्रांची तपासणी करून एबी फॉर्म देण्यात आले. पक्षाने १५१ पैकी १४३ जागांवर उमेदवार उतरविले आहेत. तर शिंदेसेनेच्या कोट्यातूनदेखील सहा उमेदवार भाजपचेच आहेत. हे उमेदवार निवडताना सर्वेक्षण अहवाल, मुलाखती इत्यादी बाबी लक्षात घेण्यात आल्या. परंतु, सहा जागांवर भाजपला अंतिम उमेदवारांचे नाव ठरविता आले नाही. त्यामुळे सहा जागांवर बारा जणांना 'एबी' फॉर्म देण्यात आले आहेत. त्यातील सहा जणांना अर्ज मागे घ्यावे लागणार आहेत.
हा प्रकार वाऱ्याच्या वेगाने कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला व त्यातून विविध चर्चांना उधाण आले आहे. याबाबत भाजपचे निवडणूक प्रभारी आ. प्रवीण दटके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी यातील कोणते नाव अंतिम होईल याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. यात कुणाचीही नाराजी राहणार नाही, असे स्पष्ट केले.
तात्पुरते समाधान की कोणाची संधी हिरावली जाणार ?
दरम्यान, भाजपमध्ये हा प्रकार झाल्याने विविध चर्चा उपस्थित होत आहेत. संबंधित जागांवर सक्षम उमेदवारांपैकी कुणाला तिकीट द्यायचे हे निश्चित होऊ शकले नव्हते. त्यामुळे दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आले. हा प्रकार एका उमेदवाराचे समाधान करण्यासाठी करण्यात आला आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
वेगाने जात भरला अर्ज
मंगळवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर दोन ठिकाणांवरील उमेदवारांनी तातडीने कायदेशीर बाबी तपासून घेतल्या व कागदपत्रे घेऊन संबंधित झोनच्या मनपा कार्यालयात जाऊन नामनिर्देशनपत्र दाखल केले. पहिला अर्ज भरलेल्या उमेदवाराला पक्षाचा अधिकृत उमेदवार मानण्यात येणार आहे.
Web Summary : BJP issued two 'AB' forms for six Nagpur seats, causing confusion before elections. Internal conflict led to indecision, forcing some candidates to withdraw. The party aims to avoid resentment through strategic decisions.
Web Summary : भाजपा ने नागपुर की छह सीटों के लिए दो 'एबी' फॉर्म जारी किए, जिससे चुनाव से पहले भ्रम की स्थिति पैदा हो गई। आंतरिक कलह के कारण अनिर्णय की स्थिति बनी, जिससे कुछ उम्मीदवारों को नाम वापस लेने के लिए मजबूर होना पड़ा। पार्टी का लक्ष्य रणनीतिक फैसलों के माध्यम से नाराजगी से बचना है।