In BJP does not have dividation : Nitin Gadkari | भाजपमध्ये ना मनभेद ना गटबाजी : नितीन गडकरी
भाजपमध्ये ना मनभेद ना गटबाजी : नितीन गडकरी

ठळक मुद्देमत न देणाऱ्यांशी संपर्क साधण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपमध्ये ना गटबाजी आहे ना मनभेद किंवा आपापसातील भांडणंसुद्धा नाहीत, त्यामुळेच भाजपचा जनाधार वाढत आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. नेत्यांनी कर्यकर्त्यांचा सन्मान करवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. लोकसभा निवडणुकीतील आपल्या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना देत त्यांच्या परिश्रमामुळेच आपण विजयी झालो. भाजपल मत न देता काँग्रेस किंवा इतर पक्षाला मत देणाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांनाही पक्षाशी जोडा, असे निर्देशही त्यांनी दिले.
भाजप सदस्यता अभियानांतर्गत पूर्व नागपुरातील कार्यकर्त्यांचा व पदाधिकाºयांचा अभ्यास वर्ग शनिवारी खरबी येथे आयोजित करण्यात आला होता. त्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, महापौर नंदा जिचकार, पूर्व नागपूर मंडळाचे अध्यक्ष महेंद्र राऊत उपस्थित होते.
‘साला मै तो साहब बन गया’ या गाण्याच्या ओळी ऐकवीत त्यांनी नेत्यांना चिमटाही काढला. ते म्हणाले, सर्व थाट सत्ता असेपर्यंत आहे. सत्ता गेल्यानंतर कुणी विचारतही नाही. अशावेळी नेत्यांनी काम करण्याची गरज आहे. आपल्याला मतदान करताना जाती, धर्म, भाषा, पंथ सर्व भेद तुटले. पक्षाचे नेतृत्व कर्तृत्ववान आहे. परंतु कार्यकर्त्यांचा सन्मान व्हायला हवा. त्याला कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम मिळायला हवे. गडकरी यांनी माजी उपमहापौर मजीद शोला यांची प्रकृती खराब असल्याची माहिती देत शहराध्यक्ष दटके यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांची मदत करण्याचे निर्देश दिले.
बूथचीही वर्गवारी
गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतानुसार बूथचीही वर्गवारी केली. ते म्हणाले, ३०० पेक्षा जास्त लीड देणारे बूथ मेरिटमध्ये आहेत. त्यापेक्षा कमी लीड देणारे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड डिव्हिजनमध्ये आहेत. जिथे पक्षाला लीड मिळाली नाही, ते नापास झाले. कार्यकर्त्यांनी आता ज्या बूथवर कमी मतं मिळाली त्या बूथवर लक्ष केंद्रित करायला हवे. विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांनाच आहे. परंतु जिथे पक्ष कमी पडला तिथे उमेदवार म्हणून मी कमी पडलो, असेही ते म्हणाले.
कार्यकर्त्यांना व्हिटॅमिन हवे
गडकरी म्हणाले की, पक्षाला मजबूत कार्यकर्ता हवा आहे. जिथे पक्षाला कमी मते मिळाली तेथील कार्यकर्ते कमजोर आहेत. त्यांचे ‘कुपोषण’ दूर करण्यासाठी त्यांना व्हिटॅमिन देण्याची आवश्यकता आहे. अशा सर्व कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवून त्यांना मजबूत करण्याचा प्रयत्न व्हायला हवा.
खरबी परिसर मनपाकडे सोपवा
आ. कृष्णा खोपडे यांनी हुडकेश्वर-नरसाळाप्रमाणे खरबी परिसरसुद्धा नागपूर महापालिकेकडे सोपविण्याची मागणी आपल्या भाषणात केली. यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. खोपडे यांची मागणी नक्कीच पूर्ण होईल, असे सांगितले. खरबी परिसर कामठी विधानसभा मतदार संघात येतो. तेव्हा पूर्ण विधानसभा क्षेत्रच नागपुरात सामील का करण्यात येऊ नये, असा चिमटाही पालकमंत्री बावनकुळे यांनी काढला.
गडकरी पुन्हा बनले सदस्य
कार्यक्रमादरम्यान नागपुरात भाजपच्या सदस्यता अभियानाला सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम टोल फ्री क्रमांकावर ‘मिस कॉल’ देऊन आपली नोंदणी केली. आ. सोले यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मिस कॉल देऊन सदस्यता नोंदणी करण्याचे आवाहन केले.


Web Title: In BJP does not have dividation : Nitin Gadkari
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.