नागपुरात बर्ड फ्लू! मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र बाधित क्षेत्र घोषित; १ किमी परिसरात प्रतिबंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 23:19 IST2026-03-24T23:19:34+5:302026-03-24T23:19:55+5:30
सेमिनरी हिल्समधील १ किमी परिसरात २१ दिवस प्रतिबंध, बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षांची तसेच निगडीत खाद्य व अंड्यांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणेबाबत जलद कृती दलास आदेश करण्यात आले

नागपुरात बर्ड फ्लू! मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र बाधित क्षेत्र घोषित; १ किमी परिसरात प्रतिबंध
आनंद डेकाटे
नागपूर : भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान आनंद नगर भोपाळ तसेच रोग अन्वेषन विभाग पुणे यांनी नागपूर येथील मध्यवर्ती अंडी उबवणी केन्द्र, सेमिनरी हिल्स्, वायूसेना नागपूर या प्रक्षेत्रातील कुक्कुट पक्षांचे नमुने एच-५एन-१ एव्हीयन एन्फल्युएंझा (बर्ड फल्यु) विषाणूकरीता होकारार्थी आढळून आल्याचे कळविले आहे. त्यामुळे या केंद्राच्या आसपास १ किलोमीटर त्रिज्येतील परिसर हा बाधित क्षेत्र तसेच बाधित क्षेत्रापासून उर्वरीत ९ किलोमीटर त्रिज्येतील परिसर केंद्र हा निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी जारी केली.
बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षांची तसेच निगडीत खाद्य व अंड्यांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणेबाबत जलद कृती दलास आदेश करण्यात आले. १ किलोमीटर त्रीज्येतील बाधीत क्षेत्रातील बांधीत परिसर निर्जतुकीकरण करण्यास परवानगी प्रदान करण्यात आली असून बांधीत क्षेत्रातील कुक्कुट पक्षी, अंडी, पक्षीखाद्य खरेदी-विक्री, वाहतुक बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील २१ दिवस पर्यंत प्रतिबंध लावण्यात आला आहे. त्यानुषंगाने बाधीत क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या पक्षांची ने-आण करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच निगराणी क्षेत्रामधील कुक्कूट पक्ष्यांची विक्री करणारी दुकाने तसेच कुक्कूट पक्षी विक्री बाजार बंद करण्याचे आदेशित करण्यात आले आहे.
रोग प्रार्दुभाव नियंत्रणात आणण्याकरिता मार्गदर्शक सुचनानुसार मध्यवर्ती अंडी उबवणी केंन्द्र, सेमिनरी हिल्स्, नागपूर या परिसरात जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तसेच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय व नागपूर महानगरपालिका आयुक्त यांनी कार्यवाही करावी. मार्गदर्शक सूचनांचे काटेकारपणे पालन करण्याची दक्षता घेऊन तात्काळ अंमलबजावणी करण्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.