नागपूर मनपात मोठा ‘स्पेअर पार्ट’ खरेदी घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 21:46 IST2017-12-05T21:38:46+5:302017-12-05T21:46:28+5:30
महापालिकेत दोन वर्षात २ कोटी ३१ लाखांच्या साहित्याची चढ्याभावाने खरेदी करण्यात आली. यात कोट्यवधीचा घोटाळा असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

नागपूर मनपात मोठा ‘स्पेअर पार्ट’ खरेदी घोटाळा
आॅनलाईन लोकमत
नागपूर :महापालिकेच्या सेवेतील वाहनांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कारखाना विभागावर आहे. दुरुस्तीसाठी खरेदी करण्यात आलेल्या स्पेअरपार्टची (साहित्य) किंमत आणि याचीच खुल्या बाजारातील किंमत यात प्रचंड तफावत आहे. वाहनांसाठी लागणारे टायर, ट्यूब, बॅटरी, कपलींग, एक्सव्हेटर अशा साहित्याची खरेदी दामदुप्पट किमतीत केली जात आहे. मागील काही वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. दोन वर्षात २ कोटी ३१ लाखांच्या साहित्याची चढ्याभावाने खरेदी करण्यात आली. यात कोट्यवधीचा घोटाळा असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
महापालिकेची लहानमोठी २०१ वाहने आहेत. या वाहनांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कारखाना विभागावर आहे. गेल्या दोन वर्षात वाहनांच्या दुरुस्तीवर २ कोटी ३१ लाखांचा खर्च करण्यात आला. परंतु बाजारभावाच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट किमतीने साहित्याची खरेदी करण्यात आली. टाटा कंपनीची गाडी इएक्स-२५१५ चे एमआरएफ कंपनीचे टायर ३५,९५० रुपये दराने खरेदी केले. परंतु खुल्या बाजारात याच टायरची किंमत १४ हजार ८०० रुपये आहे. एमआरएफचा रिडायल टायर ८५ हजार ४५६ रुपये दराने खरेदी करण्यात आला आहे. बाजारात याच टायरची किंमत १८ हजार ४०० रुपये आहे. टाटा सुमोसाठी लागणारी बॅटरी (१२ होल्ट) १८ हजार ५०० रुपये दराने खरेदी केली आहे. बाजारात याच बॅटरीची किंमत ५ हजार ३९० रुपये आहे. जेसीबीसाठी लागणारी बॅटरी २९ हजार ५७० रुपये दराने खरेदी केले जात आहे. बाजारात या बॅटरीची किंमत १२ हजार ७०० रुपये आहे. जेसीबीसाठी लागणारे इंजिन आॅईल फिल्टरची बाजार किंमत ६०० रुपये आहे. परंतु कारखाना विभागाने ५ हजार ८४२ रुपये दराने खरेदी केली आहे. डिझेल फिल्टरची प्रत्येकी १५ हजार ७८४ रुपयाला खरेदी करण्यात आली. बाजारात किंमत ५५० रुपये आहे. ४ हजार ५०० रुपये किमतीचा खिडकीचा काच ११ हजार २७४ रुपयाला खरेदी करण्यात आला. एक्सव्हेटरसाठी लागणाऱ्या व्हाल्वची किंमत १० हजार असताना तो ६९ हजार ६८३ रुपयांना खरेदी करण्यात आला आहे.