नागपुरातील मोठ्या रॅकेटचा भंडाफोड, ब्रॅंडेडच्या नावाखाली बनावट दारू, सात आरोपींना अटक
By योगेश पांडे | Updated: November 4, 2025 16:49 IST2025-11-04T16:46:31+5:302025-11-04T16:49:13+5:30
१३५ लीटर दारू जप्त : बार-वाईन शॉप्सचा सहभाग असल्याची शक्यता

Big racket busted in Nagpur, fake liquor under branded name, seven accused arrested
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्रॅंडेडच्या नावाखाली विदेशी दारूच्या तस्करी रॅकेटचा पोलिसांना भंडाफोड केला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून १३५ लीटर दारू जप्त केली आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
महेंद्र रामभाऊ बांबल (४३, गुलशननगर), निखील उर्फ निक्कू राजू नाटकर (२८, ओम साई नगर, कमळना), नारायण उर्फ बंटी बंडूजी मोथरकर (३५, कळमना, पावनगाव रोड), इब्राहिम बब्बु खान पठान (४०, भांडेवाडी), रोशन राकेश शाहू (३४, न्यू गणेशनगर, कळमना), गजेंद्र तिजूराम शाहू (३६, भवानीनगर, पुनापूर मार्ग), मणीराम उर्फ राहुल कोलेश्वर पासवान (२५, गौसिया कॉलनी, सक्करदरा) अशी आरोपींची नावे आहेत. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चिखली चौक येथील बंद असलेल्या पेट्रोलपंपाजवळ एमआच ४९ बीझेड ५३२८ या क्रमांकाची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी थांबविली. महेंद्र बांबल हा चालक होता व वाहनात सहा बॉक्सेसमध्ये सिग्रम्स रॉयल स्टॅग कंपनीच्या दारूच्या बाटल्या दिसून आल्या. चालकाकडे कोणतेही टी.पी. बिल पावती नव्हती. संबंधित दारू बनावट असल्याची बाब चौकशीतून स्पष्ट झाली. पोलिसांनी बांबलला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली. निक्कूच्या मदतीने त्याने बंटी मोथरकर याच्याकडून माल आणला होता व ते त्याची बाहेर विक्री करायचे. आरोपी त्या पैशांतून मौजमजा करायचे.
खऱ्या बाटल्यांचे सील तोडून करायचे गोलमाल
बंटीच्या घराची झडती घेतली असता तेथून पोलिसांना सहा लीटर विदेशी दारू व रॉयल स्टॅगच्या ३१ रिकाम्या बाटल्या आढळल्या. महेंद्र व निक्कू हे एज ओल्ड या गोदामातून रॉयल स्टॅगचा माल डिलिव्हरीसाठी घेऊन जायचे. निक्कू हा गाडीवर लेबर म्हणून काम करत होता व तो प्रवासादरम्यान खऱ्या बाटल्या फोडून त्यातील दारू पाण्याच्या बाटल्यांत भरायचा. खऱ्या बाटल्यांमध्ये पाणी भरून त्याल सीलपॅक करून त्या परत भरायचे.
कबाडीच्या दुकानातून विकत घ्यायचे बाटल्या
आरोपी भंगार दुकानातून रिकाम्या बाटल्या विकत घ्यायचे. ते खऱ्या बाटल्यांतील दारू त्या बाटल्यांत जमा करायचे. त्या बाटल्यांतील दारू ते खऱ्या असल्याची भासवून विकायचे.
इतर आरोपींनादेखील अटक
इब्राहीम पठान, रोशन शाहू, गजेंद्र शाहू हे वाडीतील मौजा लाव्हा येथील मे.श्रीराम ट्रेडर्स या विदेशी दारू वितरण गोदामातून विदेशी दारूचा माल डिलिव्हरीसाठी घेऊन जायचे आणि निक्कूप्रमाणे खऱ्या बाटल्यांचे सील फोडून त्यात पाण्यासोबत दारू भरायचे. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन एमएच ४९ बीझेड ३०४०, एमएच ४९ डी ६६५६ ही बोलेरो तसेच १३५ लीटर विदेशी दारू व बनावट बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडून सील करण्यासाठी आवश्यक असलेले विविध कंपन्यांची झाकणेदेखील जप्त करण्यात आली.