ऑस्करच्या शर्यतीत असलेल्या ‘सायकाे समझाे ताे’च्या निर्माता, दिग्दर्शकाला मोठा धक्का

By नरेश डोंगरे | Updated: December 26, 2024 21:43 IST2024-12-26T21:43:23+5:302024-12-26T21:43:49+5:30

निकालापूर्वीच यू ट्यूबवर अपलोड : लघुपट 'फिल्म फेस्टीव्हल'मध्ये अपात्र ठरण्याची भीती

Big blow to the producer and director of Psycho Samajo To which is in the race for an Oscar | ऑस्करच्या शर्यतीत असलेल्या ‘सायकाे समझाे ताे’च्या निर्माता, दिग्दर्शकाला मोठा धक्का

ऑस्करच्या शर्यतीत असलेल्या ‘सायकाे समझाे ताे’च्या निर्माता, दिग्दर्शकाला मोठा धक्का

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक महिने परिश्रम घेऊन निर्माण केलेल्या लघुपटाने थेट राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले. हा लघुपट भारताकडून चक्क ऑस्कर निवडीच्या शर्यतीत पोहचला. असे असताना अज्ञात आरोपीने तो यू ट्यूब चॅनलवर अपलोड केला. परिणामी 'सायको समझो तो' या लघुपटाच्या निर्माता, दिग्दर्शकाला जोरदार धक्का बसला आहे. हा लघुपट ऑस्करच्या शर्यतीत अपात्र ठरण्याचीही भीती निर्माण झाली आहे.

सतीश माेहाेड यांच्या ऑरेंज सिटी प्राेडक्शनकडून ‘सायकाे समझाे ताे’ या लघुपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्याचे दिग्दर्शन निखिल शिरभाते यांनी केले आहे. मोहोड आणि शिरभाते हे दोघेही नागपूरचे रहिवासी आहेत. स्टोरी, एक्टिंग, शुटिंग, एडिटिंगसह विविध पातळ्यांवर लघुपटाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी या दोघांनी आपल्या सहकाऱ्यांसह अनेक महिने रात्रंदिवस परिश्रम घेतले. मोठा आर्थिक भारही सहन केला. त्यानंतर ज्याने कुणी तो लघुपट बघितला त्याने त्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. छोट्या मोठ्या साेहळ्यातही काैतुक झाले. त्यानंतर लघुपटाने वर्ल्ड इंडी फिल्म फेस्टिव्हलच्या फायनलमध्ये धडक दिली. एवढेच काय, नवी दिल्ली येथे फिल्म फेस्टिव्हलमध्ये या लघुपटाला पुरस्कार मिळाला. यशाचा कळस म्हणजे, ऑस्करसाठी निवडण्यात आलेल्या पाच लघुपटांमध्ये 'सायको समझो तो'चा समावेश झाला. परिणामी निर्माता-दिग्दर्शक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नेत्रदीपक यशाचे स्वप्न बघू लागले. अशात निर्माता, दिग्दर्शकाची कोणतीही परवानगी न घेता २१ डिसेंबरला लूपलेन्स नावाच्या यू ट्यूब चॅनलवर हा लघुपट रिलिज करण्यात आला. २४ डिसेंबरला ते माहित पडताच निर्माता, दिग्दर्शकांना जबर धक्का बसला. त्यांनी लगेच यू ट्यूबकडे तक्रार केली. त्यानंतर तो यू ट्यूबवरून हटविण्यात आला. मात्र, तीन दिवसांत हा लघुपट सार्वजनिक झाल्यामुळे तो अनेकांनी बघितला. परिणामी फिल्म फेस्टीव्हलसाठी तो अपात्र ठरतो की काय, अशी भिती निर्माण झाली आहे. या संबंधाने मोहोड आणि शिरभाते यांनी आज सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
 
नुकसान कसे भरून निघेल ?
लघुपट ऑस्करच्या शर्यतीत असल्याने गगनभरारीचे स्वप्न बघत होतो. मात्र, अज्ञात आरोपीने आमच्या स्वप्नांचा चुराडा केला. सायबर पोलिसांकडून आरोपीवर कारवाई होईल ती होईल. मात्र, आमच्या परिश्रमावर पाणी फेरले गेले, व्यावसायिक नुकसान झाले ते कसे भरून निघेल, असा प्रश्न निर्माता सतीश मोहोड यांनी लोकमतशी बोलताना उपस्थित केला आहे.

Web Title: Big blow to the producer and director of Psycho Samajo To which is in the race for an Oscar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.