९४ वे साहित्य संमेलन; विदर्भाकडून संमेलनाध्यक्षपदासाठी केवळ भारत सासणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 06:00 AM2021-01-23T06:00:00+5:302021-01-23T06:00:22+5:30

Nagpur news; नाशिक येथे नियोजित ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे नाव जाहीर होण्याच्या एक दिवस आधी राजकारण, साहित्यकारण आणि अट-कारणाचा खेळ रंगला आहे.

Bharat Sasne from Vidarbha for the post of Nashik Samelan president | ९४ वे साहित्य संमेलन; विदर्भाकडून संमेलनाध्यक्षपदासाठी केवळ भारत सासणे

९४ वे साहित्य संमेलन; विदर्भाकडून संमेलनाध्यक्षपदासाठी केवळ भारत सासणे

Next
ठळक मुद्देनारळीकरांच्या अटी महामंडळ मान्य करणार!राष्ट्रवादीचा किल्ला वाघमारेंच्या मागे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नाशिक येथे नियोजित ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे नाव जाहीर होण्याच्या एक दिवस आधी राजकारण, साहित्यकारण आणि अट-कारणाचा खेळ रंगला आहे. जयंत नारळीकर, भारत सासणे आणि जनार्दन वाघमारे यांच्यापैकी एक नाव निश्चित होणार आहे. विदर्भ साहित्य संघाकडून अध्यक्षपदासाठी तीन नावे देण्याचा पर्याय असताना, केवळ प्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे यांचे एकट्याचेच नाव पाठविण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

संमेलनस्थळ जाहीर होताच भारत सासणे यांचे अध्यक्षपदासाठीचे नाव अग्रक्रमाने चर्चेत आले होते. घुमान साहित्य संमेलनातील मानापमान नाट्यामुळे, महामंडळ अध्यक्षांची पसंती त्यांच्याच नावाला असल्याचेही बोलले जाते. विदर्भ साहित्य संघासाठीही आपुलकीचा विषय असल्याच्या कारणाने घटकसंस्था म्हणून भारत सासणे यांचे एकट्याचेच नाव अध्यक्षपदासाठी म्हणून सुचविण्यात आले आहे. तसे पाहता प्रत्येक घटक संस्थेला तीन नावांचे पर्याय देण्याचा अधिकार आहे. मात्र, वि. सा. संघाने दुसऱ्या कुणाचेही पर्याय देण्यापेक्षा सासणे यांच्याच नावाचा विचार केला आहे. विशेष म्हणजे, अध्यक्षपदासाठी जेव्हा निवडणुका घेतल्या जात होत्या तेव्हा विदर्भ साहित्य संघ ज्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत असे, तोच उमेदवार अध्यक्षपदी विराजमान होत असल्याचा इतिहास आहे.

मात्र, जेव्हापासून निवडणुका बाद करण्यात आल्या, तेव्हापासूनचे चित्र बदलले आहे. तरीदेखील महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघ यांच्यात सासणे यांच्या नावावरून एकमत होत असल्याने सासणेच अध्यक्ष होतीत, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यातच नाशिक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून छगन भुजबळ यांच्याच नावाची चर्चा आहे. अध्यक्षपदाच्या घोषणेसोबतच स्वागताध्यक्षांचीही घोषणा होईल. त्याच अनुषंगाने माजी महापौर व खासदार प्रसिद्ध साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्यामुळे, सासणे की वाघमारे अशा विवंचनेत महामंडळ आहे. त्यावर तोडगा म्हणून महामंडळाकडून प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत नारळीकर यांना आधीपासूनच विचारणा केली जात होती. वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे नारळीकरांनी प्रारंभी नकार कळविल्यानंतर आता त्यांनी काही अटींसकट प्रस्तावाला संमती दिली आहे. केवळ उद्घाटनाला ते उपस्थित राहतील, उर्वरित तीनही दिवस ते नसतील, ऑनलाइन भाषण व मुलाखत देतील, अशा त्या अटी आहेत. नारळीकर हे अध्यक्ष झाल्यास प्रथमच विज्ञान क्षेत्रातील साहित्यिकाला हा बहुमान मिळणार आहे.

विशेष म्हणजे, नारळीकरांच्या नावाला कुणाचा विरोधही नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचे पारडे जड ठरत आहे. गेल्या संमेलनात परंपरा खंडित गेल्या संमेलनात संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ऐनवेळी प्रकृती बिघडली होती. त्या वेळी त्यांनी व्हीलचेअरवर उपस्थित राहून संमेलनाचे उद्घाटन केले होते आणि नंतर उपचारासाठी मुंबईला गेले होते. इतिहासात प्रथमच संमेलनाध्यक्षांच्या अनुपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला होता. यंदा नारळीकरांनी सादर केलेली अट महामंडळाने मान्य केल्यास, इतिहासाची पुनरावृत्ती लागोपाठ होणार आहे. अशा स्थितीत संमेलनाध्यक्ष पदाबाबत अनेक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Bharat Sasne from Vidarbha for the post of Nashik Samelan president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.