नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 21:37 IST2025-08-25T21:37:05+5:302025-08-25T21:37:27+5:30

पाळीव कुत्र्यांबाबत ‘अलर्ट’, तोंडाला जाळी लावणे अनिवार्य : गळ्यातील पट्ट्यावर मालकाचे नाव व पत्ता लिहीणे बंधनकारक

Beware if you feed dogs on the streets of Nagpur! Be prepared for action | नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार

नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार

योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क


उपराजधानीत मोकाट कुत्र्यांची समस्या कायमच असताना अनेक वस्त्यांमध्ये पाळीव कुत्र्यांमुळेदेखील नागरिकांना मन:स्ताप होत असल्याचे चित्र आहे. अनेक मालक नियमांचे पालन न करता मनमानी पद्धतीने कुत्र्यांना आजुबाजूच्या वस्त्यांमध्ये फिरवतात व काही वेळा हे पाळीव श्वान इतरांना चावा घेतात. हीच बाब लक्षात ठेवून नागपूर पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनी अधिसूचना जारी केली आहे. पाळीव कुत्र्यांना बाहेर फिरविताना त्यांच्या तोंडाला विशिष्ट पद्धतीची जाळी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणे व रस्त्यांवर श्वानांना खाऊ घातल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

सोमवारी पोलीस आयुक्तांनी अधिसूचना जारी केली. अनेक पाळीव कुत्र्यांचे मालक त्यांना फिरायला नेताना वाट्टेल तेथे नैसर्गिक विधीसाठी बसवतात. त्यामुळे नागरिकांना मन:स्ताप होतो. काही कुत्र्यांचे मालक तर त्यांना दरवाजाबाहेर फिरायला सोडून देतात. काही कुत्र्यांनी परिसरातील लोकांनाच चावे घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. ही बाब लक्षात ठेवून पाळीव कुत्र्यांना बाहेर नेताना त्यांच्या तोंडाला विशिष्ट प्रकारची जाळी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. कुत्र्याला श्वास घ्यायला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही या पद्धतीने जाळी लावण्यात यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. जर जाळीशिवाय कुत्रा आढळला तर त्याला मोकाट कुत्रा समजून कारवाई करण्यात येणार आहे. कुत्र्यांच्या गळ्यातील पट्ट्यावर मालकाचे नाव व पत्ता लिहीणे बंधनकारक आहे.

रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर कारवाई
सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. मनपाने घोषित केलेल्या श्वान अन्न पुरवठा ठिकाणीच अन्न पुरवता येईल. इतर कुठेही कुत्र्यांना अन्न दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

कुत्र्यांचा उपद्रव असेल तर ११२ वर करा संपर्क
शहरातील अनेक रस्त्यांवर मोकाट तसेच पाळीव कुत्र्यांचा उपद्रव दिसून येतो. जर जास्त उपद्रव वाढला तर थेट ११२ वर किंवा मनपा अथवा जवळील पोलीस ठाण्यात फोन करून माहिती द्यावी असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

अडथळा आणल्यास कारवाई
अनेकदा कुत्र्यांना अनधिकृतपणे खाऊ घालणारे लोक किंवा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला प्राणीप्रेमींकडून विरोध करण्यात येतो. मात्र लोकसेवकांच्या कामात अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

Web Title: Beware if you feed dogs on the streets of Nagpur! Be prepared for action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.