नागपुरातील वर्धा मार्गावरील बीअरबार फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 03:59 IST2020-05-07T22:18:57+5:302020-05-08T03:59:28+5:30
वर्धा मार्गावरील डोंगरगावचा एक बीअर बार फोडून चोरट्यांनी विदेशी मद्य आणि बीअरच्या बाटल्या लंपास केल्या. बुधवारी ही घटना उघडकीस आली.

नागपुरातील वर्धा मार्गावरील बीअरबार फोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा मार्गावरील डोंगरगावचा एक बीअर बार फोडून चोरट्यांनी विदेशी मद्य आणि बीअरच्या बाटल्या लंपास केल्या. बुधवारी ही घटना उघडकीस आली.
नागपूर-वर्धा मार्गावरील डोंगरगाव येथे अरविंद रमाकांत जयस्वाल (वय ४८, रा. बुटीबोरी) यांचा अंबिका डिलक्स बार अॅण्ड रेस्टॉरंट आहे. मंगळवारी रात्री त्यांच्या बारमधील स्टाफ रूमच्या दाराचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. त्यांनी शोकेसमध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या विदेशी मद्याच्या तसेच बीअरच्या बाटल्या असा एकूण १ लाख ३१ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. बुधवारी ही घटना उघडकीस आली. बार मालकाने चोरीला गेलेल्या मद्याचे मूल्यांकन करून हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी जयस्वाल यांच्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
विशेष म्हणजे, अनेक ठिकाणांच्या वाईन शॉपला सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी नागपुरात कोरोनाचा झपाट्याने संसर्ग होत असल्यामुळे खबरदारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागपूर शहरात आणि जिल्ह्यात वाईन शॉप सुरू करण्यावर बंदी कायम ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर शहर आणि शहराच्या आजूबाजूच्या भागातील बीअर बार तसेच वाईन शॉप फोडून मद्य चोरून नेण्याच्या घटना सारख्या वाढत आहेत. दीड महिन्यात बीअर बार तसेच वाईन शॉप फोडून मद्य चोरून नेण्याची ही नववी घटना आहे.