कर्ज चुकविण्यासाठी बनला गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:49 IST2020-12-17T23:47:43+5:302020-12-17T23:49:01+5:30
Became criminal for debt, crime news बहिणीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज चुकविण्यासाठी एक तरुण नाहकच गुन्हेगार बनला. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत.

कर्ज चुकविण्यासाठी बनला गुन्हेगार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहिणीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज चुकविण्यासाठी एक तरुण नाहकच गुन्हेगार बनला. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. युगल गोविंदराव निमजे (वय २३) आणि अश्विन शामराव येवलेकर (वय २२) अशी आरोपी तरुणांची नावे असून त्यांचा एक साथीदार फरार आहे.
एमआयडीसीतील सूरज जोशी यांच्या प्रेसमध्ये निमजे काम करतो. गिट्टीखदानमधील सुधीरकुमार सूद यांच्याकडून प्रिंटिंग प्रेसच्या कामाचा ॲडव्हान्स घेण्यासाठी जोशी यांनी निमजेला सूद यांच्याकडे बुधवारी दुपारी पाठवले होते. तेथून त्याला ५२ हजार रुपये घ्यायचे होते. ही रक्कम लुटण्याचा कट निमजेने आपल्या मित्रांसोबत बनविला. त्यानुसार निमजेने सूद यांच्याकडून ५२ हजार रुपये घेताच फ्रेण्डस काॅलनीत त्याच्या मित्रांनीच त्याच्याकडून ही रोकड हिसकावून पळ काढला. घटनेची माहिती कळताच गिट्टीखदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली. निमजेच्या बयाणातील विसंगती लक्षात घेत त्यांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे निमजे गडबडला आणि लुटमारी करणारे कोण ते सांगतानाच या गुन्ह्याची पार्श्वभूमीही कथन केली.
करायला गेले काय अन्...
बहिणीच्या लग्नासाठी निमजेने ४० हजारांचे कर्ज घेतले होते. त्याबदल्यात स्वत:ची बाईक गहाण ठेवली होती. कर्जाचे व्याज वाढतच होते. ही रक्कम लुटून कर्ज चुकविण्याची त्याची योजना होती. मालकासाठी छोटी रक्कम असल्यामुळे पोलिसांकडे प्रकरण जाणार नाही, असेही त्याला वाटत होते. मात्र, प्रकरण पोलिसांकडे गेले आणि तो तसेच त्याचे दोन मित्रही नाहकच गुन्हेगार म्हणून आता पोलिसांच्या रेकॉर्डवर आले.