उपलब्ध नैसर्गिक संसाधनाच्या काटेकोर नियोजनातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध व्हा !
By आनंद डेकाटे | Updated: April 26, 2024 14:10 IST2024-04-26T14:06:17+5:302024-04-26T14:10:24+5:30
जिल्हाधिकारी विपीन इटनकर : खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत नियोजन

District Collector Office
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतीतील नवनवीन प्रयोगांद्वारे साध्य झालेले बदल व वाढलेले उत्पादन हे प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय शेतकऱ्यांना त्याची अनुभूती घेता येणार नाही. येणारा काळ हा उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांच्या काटेकोर वापरातून अधिकाधिक उत्पादनाची हमी घेणारा कसा राहील, याकडे कृषी विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे. खरीप हंगामाला सामोरे जाताना शेतकऱ्यांच्या विश्वासाला अधिक दृढ करण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या व्यापक संवादाची, शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी कुशल जैन, उपवन संरक्षक डॉ. भारतसिंग हाडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाप्पासाहेब नेमाणे, विभागीय कृषी सहसंचालक शंकर टोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, आत्माच्या प्रकल्प संचालिका अर्चना कडू, कृषी महाविद्यालयाचे प्रा. विनोद खडसे उपस्थित होते.
खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले बी-बियाणे, रासायनिक खते याची मुबलक उपलब्धी असणे गरजेचे आहे. यादृष्टीने कृषी विभागाने रासायनिक खतांसह गुणवत्तापूर्ण बी-बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील खरीप हंगामाबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
- असे आहे जिल्ह्यातील खरीप हंगामाचे प्रस्तावित लक्ष्य
या खरीप हंगामात तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य क्षेत्रात शेतकऱ्यांना वेळेवर बियाणांसह खतांचा पुरवठा होण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यात भात पिकाचे उत्पादन हे ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाईल. यात १ हजार ३४१ हेक्टर क्षेत्राची वाढ दृष्टिपथात ठेवली आहे. सोयाबीन पिकासाठी ९० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित ठेवले असून सुमारे ३ हजार ५२९ हेक्टर क्षेत्राची यात वाढ अपेक्षित आहे. कापूस पिकासाठी २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित केले असून यात सुमारे ३ हजार ७८१ हेक्टर एवढी वाढ अपेक्षित आहे. तेल बियांवर भर देण्याच्या दृष्टिकोनातून जवस पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन व उत्पन्न हाती कसे घेता येईल यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.