सिलिंडरची शेगडी, हेल्मेटने मारून बारमधील वेटरचा खून

By दयानंद पाईकराव | Updated: June 7, 2025 17:25 IST2025-06-07T17:25:19+5:302025-06-07T17:25:55+5:30

विहिरगावमधील घटना : गावाकडील सहकाऱी खून करून झाला फरार

Bar waiter murdered by hitting him with cylinder grate and helmet | सिलिंडरची शेगडी, हेल्मेटने मारून बारमधील वेटरचा खून

Bar waiter murdered by hitting him with cylinder grate and helmet

नागपूर : विहिरगावमध्ये किरायाच्या एकाच खोलीत राहून वेगवेगळ्या बारमध्ये वेटरचे काम करणाऱ्या दोघांमध्ये वाद झाला. यात सिलींडरची शेगडी आणि हेल्मेटने मारून एका वेटरने आपल्या सहकाऱ्याचा खून केला. खुनानंतर खोलीला कुलुप लाऊन बॅग घेऊन तो फरार झाला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

अनिल मधुकर पवार (३६, रा. पिंपळगाव, नेर, जि. यवतमाळ) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. तर राजु महादेव पवार (३४) असे आरोपीचे नाव आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विहिरगाव येथे मनोज शंकर दळने (४४, रा. विहिरगाव, उमरेड रोड, हुडकेश्वर) यांचे घर आहे. त्यांनी एक खोली अनिल पवार यास किरायाने दिली होती. आपण उमरेड रोडवरील विहिरगावच्या त्रिमूर्ती बारमध्ये वेटरचे काम करीत असल्याचे त्याने दळने यांना सांगितले होते. त्यानंतर चार ते पाच दिवसांनी अनिलच्या गावाजवळ राहणारा आरोपी राजु पवार हा त्याच्या खोलीत राहण्यासाठी आला. त्याने आपण उमरेड रोडवरील द शिप हॉटेलमध्ये वेटर असल्याची माहिती दिली होती. दरम्यान ६ जून २०२५ रोजी घरमालक दळने हे आपल्या घरी असताना त्यांना विहिरगावच्या पोलिस पाटलांनी झोपडपट्टीत असलेल्या त्यांच्या खोलीतून घाणेरडा वास येत असल्याची माहिती दिली. दळने यांनी इतर व्यक्तींसोबत जाऊन खोलीचे कुलुप तोडून पाहिले असता अनिल हा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर मृतावस्थेत पडून असल्याचे दिसले.

हुडकेश्वर पोलिसांनी चौकशी केली असता अनिल १ जूनला रात्री कामावरून परत गेल्यानंतर पुन्हा कामावर आला नसल्याचे सांगितले. तसेच राजु पवार हा सुद्धा ३ जूनपासून कामावर गेला नसल्याची माहिती मिळाली. त्यांच्या खोलीशेजारी राहणाऱ्या महिलेने दुपारी ३ वाजता आरोपी राजु बॅग घेऊन जाताना दिसल्याचे सांगितले. पोलिसांनी खोलीची पाहणी केली असता लहान गॅस सिलिंडरची शेगडी व काळ्या रंगाचे हेल्मेट मारून अनिलचा खून केल्यानंतर आरोपी पळून गेल्याचे समजले. या प्रकरणी दळने यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण महामुनी यांनी आरोपी राजु पवार विरुद्ध कलम १०३ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title: Bar waiter murdered by hitting him with cylinder grate and helmet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.