बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:24 IST2020-12-04T04:24:34+5:302020-12-04T04:24:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे सव्वा कोटीचे कर्ज उचलून बँकेला गंडा घालणाऱ्या एका चौकडीविरुद्ध सदर पोलिसांनी ...

Bank fraud on the basis of forged documents | बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची फसवणूक

बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे सव्वा कोटीचे कर्ज उचलून बँकेला गंडा घालणाऱ्या एका चौकडीविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वीच ही बनवाबनवी बँकेच्या लक्षात आल्यानंतरही तक्रार नोंदवण्यास का उशीर झाला, ते स्पष्ट न झाल्यामुळे आश्चर्यवजा संशय व्यक्त केला जात आहे.

प्रमोद मोतीराम वालमांढरे, शीतल प्रमोद वालमांढरे (रा. बालाजीनगर), कृष्णकुमार लक्ष्मणराव देशमुख (रा. शंकरनगर) आणि रोशन होरे (रा. प्रतापनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपी प्रमोद वालमांढरे आणि त्याची पत्नी शीतल या दोघांनी २०१३ मध्ये तत्कालीन काॅर्पोरेशन बँक आणि सध्याच्या युनियन बँक ऑफ इंडिया किंग्सवे शाखेमध्ये गृह कर्ज मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. त्यासाठी त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे आणि निर्मलाबाई जोशी यांच्या मालमत्तेची कागदपत्रे सादर केली होती. कागदोपत्री पूर्तता केल्यानंतर बँकेने २४ नोव्हेंबर २०१३ ला आरोपी प्रमोद आणि शीतल वालमांढरे या दोघांना एक कोटी २० लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. घराचे विक्रीपत्र झाल्यानंतर गृहकर्जाचा डिमांड ड्राफ्ट मूळ भूखंड मालक आरोपी देशमुख यांच्या नावाने तयार करून देण्यात येईल, असे ठरले होते. त्यानुसार शीतल, प्रमोद आणि देशमुख या तिघांनी संबंधित घराचे विक्रीपत्र बँकेत जमा केले. त्यानंतर बँकेने एक कोटी नऊ लाख रुपये (डीडी) आरोपी देशमुख याच्या खात्यात जमा केले, तर ११ लाखाची रक्कम घर दुरुस्तीच्या नावाखाली वालमांढरे दाम्पत्‍याला दिली. घर दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या रकमेपैकी पाच लाख रुपये वालमांढरे दाम्पत्याने आरोपी देशमुखच्या खात्यात हस्तांतरित केले. दरम्यान, आरोपींना कर्जाची परतफेड दरमहा एक लाख २० हजार रुपये अशा स्वरूपात परत करायची होती. ठरल्याप्रमाणे ३ जुलै २०१५ पर्यंत आरोपींनी नियमित हप्ते भरले. नंतर मात्र रक्कम भरणे बंद केल्यामुळे ३१ जुलै २०१५ ला बँकेने आरोपींना नोटीस पाठविली. प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बँक व्यवस्थापक आणि कर्मचारी प्रमोद वालमांढरे यांच्या घरी गेले. त्यावेळी बनवाबनवी उघड झाली. ज्या घराचे आरोपींनी विक्रीपत्र करून कर्ज उचलले होते, ते घर निर्मलाबाई जोशी यांचे असून त्यांनी १९८८ मध्ये नोंदणीकृत मृत्युपत्र तयार करून प्रदीप भुसारी नामक नातेवाईकाच्या नावे केले होते. तेथे आरोपी रोशन होरे हा भाड्याने राहत होता. २६ जुलै १९९५ ला निर्मलाबाई मृत झाल्यानंतर आरोपी होरे याने बनावट कागदपत्र तयार केले आणि ती मालमत्ता स्वतःच्या नावे करून घेतली. त्यामुळे प्रदीप भुसारी यांनी या मालमत्तेच्या ताब्यासाठी न्यायालयात धाव घेतली. आरोपी होरेविरुद्ध गुन्हाही दाखल केला. ही पार्श्वभूमी असताना आरोपी वालमांढरे दाम्पत्य, देशमुख तसेच होरे या चौघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत कर्ज प्रकरण सादर करून एक कोटी २० लाख रुपयाची उचल केली आणि ती रक्कम स्वतः वाटून घेतली.

----

विलंब का?

विशेष म्हणजे १९९५ ला ही बनवाबनवी उघड झाली असताना बँकेने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास पाच वर्षे का लावली, ते कळायला मार्ग नाही. सदर पोलिसांनी बँक व्यवस्थापक राजेश पांडुरंग गावंडे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. उपरोक्त आरोपींची चौकशी केली जात आहे.

-----

Web Title: Bank fraud on the basis of forged documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.