दुबईला जाणाऱ्या बांगलादेशच्या विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग; सर्व प्रवासी सुरक्षित

By मोरेश्वर मानापुरे | Updated: February 20, 2025 22:33 IST2025-02-20T22:32:54+5:302025-02-20T22:33:31+5:30

तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाने घेतला निर्णय

Bangladeshi flight bound for Dubai makes emergency landing in Nagpur; all passengers safe | दुबईला जाणाऱ्या बांगलादेशच्या विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग; सर्व प्रवासी सुरक्षित

दुबईला जाणाऱ्या बांगलादेशच्या विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग; सर्व प्रवासी सुरक्षित

नागपूर : बांगलादेश विमान एअरलाइन्सच्या विमानाला बुधवारी रात्री नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमान ढाकाहून दुबईला जात होते, परंतु सामानाच्या भागात धूर निघत असल्याने वैमानिकाने एटीएसच्या परवानगीनंतर विमान नागपूर विमानतळावर सुरक्षित उतरविले. हे विमान गुरुवारी सायंकाळी ५.३३ वाजता दुबईकडे रवाना झाले.

बुधवारी रात्रीनंतर विमानात स्मोक डिटेक्टर अलार्म वाजल्याने घबराट पसरली. धूर वाढत असल्याने गोंधळ उडाला. सुरक्षिततेचा विचार करून, वैमानिकाने नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विमानातील सर्व ४०५ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. प्रवाशांना विमानतळ टर्मिनल इमारतीत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवाशांना विमानतळावर १७ तास मुक्काम करावा लागला.

अग्निशमन दल रात्रभर ड्युटीवर

घटनेची माहिती मिळताच, एमआयएल आणि एमआयडीसी अग्निशमन दल धावपट्टीवर पोहोचले. तसेच, नागपूर मनपाच्या नरेंद्रनगर येथील अग्निशमन विभागाला रात्री आपत्कालीन लँडिंगची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्या विमानतळावर पाठवण्यात आल्या. बांगलादेश एअर लाईन्सचे कर्मचारी प्रवाशांच्या सेवेत होते. बांगलादेश एअरलाइन्सचे दुसरे विमान गुरुवारी नागपूर विमानतळावर पोहोचले आणि या विमानातून सर्व प्रवाशांना दुबईला पाठवण्यात आले.

यापूर्वी, १० नोव्हेंबर २०२४ रोजी विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन मिळाल्याने नागपूरवरुन कोलकाता जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्स विमानाचे तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमान रायपूर विमानतळावर उतरवण्यात आले होते. याशिवाय २० जून २०२४ रोजी यूएस-बांगला एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक बीएस-३४३ या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे इमर्जंसी लॅडिंग करण्यात आले होते.

Web Title: Bangladeshi flight bound for Dubai makes emergency landing in Nagpur; all passengers safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.