बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आकस्मिक लँडिंग
By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 20, 2024 20:00 IST2024-06-20T20:00:15+5:302024-06-20T20:00:51+5:30
दुसऱ्या क्रमांकाचे इंजिन खराब; विमानातून निघाला घूर

बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आकस्मिक लँडिंग
नागपूर : बांगलादेशच्या चटगाव येथून गुरुवारी सकाळी ९ वाजता दुबईकडे रवाना झालेल्या झालेल्या विमानाचे नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लँडिंग करण्यात आले. विमानातील दुसऱ्या क्रमांकाचे इंजिन खराब झाल्याने आणि लँडिंग गिअरजवळ धूर निघू लागल्यानंतर विमानाचे लँडिंगचे करण्यात आल्याचे मुख्य कारण सांगितले जात आहे. या विमानात १७० प्रवासी होते.
गुरुवारी सकाळी ९ वाजता चटगावच्या शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट प्रवासाचे हे विमान (एफझेड-५६४) दुबईकडे रवाना झाले. एक तासातच विमानाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या इंजिन खराब झाले आणि लँडिंग गिअरमधून धूर निघू लागला. या घटनेच्यावेळी विमान नागपूरजवळच होते. वैमानिकाने नागपूर विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान उतरविण्याची परवानगी मागितली. त्यानंतरच विमान उतरविण्यात आले. विमानाची दुरुस्ती लवकर होण्याची काहीही शक्यता नसल्याने बांगलादेशातून दुसरे विमान दुपारी ३.५९ वाजता नागपुरात पोहोचले. हे विमान प्रवाशांना घेऊन नागपुरातून सायंकाळी ६.३० वाजता दुबईकडे रवाना झाले.