बॅण्ड, बाजा, वरात... सर्वच ठप्प! ;  वाद्यवृंदांवर बेरोजगारीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 08:55 PM2020-04-02T20:55:40+5:302020-04-02T20:56:09+5:30

विवाहादी समारंभात बाजा वाजल्याशिवाय मजा नाही. मात्र, विवाह आणि इतर सोहळेच स्थगित किंवा रद्द झाल्याने बाजाा वाजविणाऱ्या बॅण्डपथकांवर जगण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

Band, Baja, Varat ... all jammed! ; Unemployment slump on orchestras | बॅण्ड, बाजा, वरात... सर्वच ठप्प! ;  वाद्यवृंदांवर बेरोजगारीचे सावट

बॅण्ड, बाजा, वरात... सर्वच ठप्प! ;  वाद्यवृंदांवर बेरोजगारीचे सावट

googlenewsNext
ठळक मुद्देदहा ते १२ कोटींचा व्यवसाय बुडाला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना नावाच्या संकटो जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि त्याचे दुष्परिणाम हळूहळू पुढे यायला लागले आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रावर या महामारीची मार बसली असून, बेरोजगारी व व्यवसाय बुडीचे संकट निर्माण झाले आहे. विवाहादी समारंभात बाजा वाजल्याशिवाय मजा नाही. मात्र, विवाह आणि इतर सोहळेच स्थगित किंवा रद्द झाल्याने बाजाा वाजविणाऱ्या बॅण्डपथकांवर जगण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
साधारणत: दिवाळीत तुळशीविवाह आटोपले की विवाह मुहूर्त काढले जातात. आपल्याकडील वातावरणीय स्थिती बघता, कृषी व्यवसायातील उसंत बघता आणि शाळा-कॉलेजेसच्या परीक्षांचा विचार करता बहुतांश विवाह सोहळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात होत असतात. एका दिवसाला एकाच शहरात हजारावर विवाह सोहळे होत असल्याचे चित्रही बघण्यात आले आहे. मंगलकार्यालय उपलब्ध नाहीत म्हणून देवळांमध्येच असे विवाहसोहळे उरकले गेल्याचेही वेळोवेळी बघण्यात आले आहे. विवाहसोहळा म्हणजे दोन कुटूंबीयांच्या नात्यांचा मजबूत बंध असण्यासोबतच अनेक रोजगारही देणारे ठरतात. त्यातील प्रमुख भाग म्हणजे बॅण्डपथकांचा असतो. नवरदेवाची वरात बॅण्ड, बाजा किंवा संदलच्या गजरात काढली जाते. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असल्याने, बॅण्डपथक या प्रसंगाला संस्मरणीय करत असतात. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशात लॉकडाऊनची स्थिती निर्माण होताच अनेक अनेक विवाह सोहळे स्थगित किंवा रद्द करण्यात आले आहेत. १५ एप्रिलपर्यंतचे जवळपास सगळेच सोहळे पुढील अनुकुल स्थिती निर्माण होईपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. अशा स्थितीत याच विवाहसोहळ्यांच्या भरवशावर जिवनयापन करणारे बॅण्डपथक बेरोजगारीशी भांडत असल्याचे चित्र आहे. नागपुरात साधारणत: लहान-मोठे मिळून १२ हजार वादक आहेत. या वादकांचे वेगवेगळे ग्रुप असून, या काळात हे बॅण्डपथक अतिशय व्यस्त असतात. दिवसाला तीन ते चार विवाहसोहळ्यांत त्यांचे वादन होत असते आणि हजारो रुपये कमावून घरी जात असतात. साधारणत: या काळात बॅण्डपथक व वाद्यवृंदांचा १२ ते १५ कोटी रुपयांचा व्यवसाय होत असतो. तो बुडाला असून, लॉकडाऊनमुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनचा काळ आणखी वाढला तर कसे होईल, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

कोरोनाने सगळेच हिरावले, मदतीची गरज - लहानू इंगळे
: हे तीन ते चार महिने बॅण्डपथक व वाद्यवृंदांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. याच काळात संपूर्ण वर्षभराची कमाई होत असते. मात्र, नेमक्या याच महिन्यांत कोरोनाचे सावट निर्माण झाले आणि लॉकडाऊनमुळे आमचा धंदाच चौपट झाल्याची वेदना नागपूर बॅण्ड असोसिएशनचे सचिव लहानू इंगळे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. कमाईचे नेमके महिने कोरडे जात असल्याने, वर्षभर अत्यंत बिकट स्थितीचा सामना वादकांना करावा लागणार आहे. अशा स्थितीत सरकारने आम्हा बॅण्डपथक व वाद्यवृंदांना मदत करणे गरजेचे असल्याची भावना इंगळे यांनी व्यक्त केली.

१४०० पथक
: शहरात नोंदणीकृत बॅण्डपथकांची संख्या ११० आहे आणि छोटे व मध्यम बॅण्ड पथक, संदल, पंजाबी ढोल व इतर पथकांची संख्या १३००च्या जवळपास आहे. प्रत्येक पथकात १० ते २० संख्येने वादकांची संख्या असते. हे पथक एका तासाच्या वादनासाठी १५ ते ३० हजार रुपयांपर्यंत आकारणी करत असते. साधारणत: एकाच दिवसात तीन ते चार वादनाच्या कार्यक्रमातून ८० हजार ते १ लाख २० हजारापर्यंतची कमाई होत असते. कमाईचा काळ हा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचाच असतो. जूनपासून पावसास सुरुवात होत असल्याने कमाई बंद असते. नेमक्या कमाईच्या काळातच धंदा चौपट झाल्याने बॅण्डपथक व वाद्यवृंद तणावात आहेत.

Web Title: Band, Baja, Varat ... all jammed! ; Unemployment slump on orchestras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.