बल्लारशाह - सेवाग्राम विभागाची सुरक्षा तपासणी; ब्रीज, केबिनचे ऑडिट
By नरेश डोंगरे | Updated: February 14, 2025 23:22 IST2025-02-14T23:22:04+5:302025-02-14T23:22:18+5:30
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा वार्षिक दाैरा

बल्लारशाह - सेवाग्राम विभागाची सुरक्षा तपासणी; ब्रीज, केबिनचे ऑडिट
नागपूर : विविध विभागाच्या शिर्षस्थ अधिकाऱ्यांचा ताफा सोबत घेऊन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी नागपूर विभागातील बल्लारशाह - सेवाग्राम रेल्वे मार्गाची सूक्ष्म सुरक्षा तपासणी केली. हे करतानाच त्यांनी ब्रीज, केबिन, पॅनलसह वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कामाचा दर्जाही तपासला.
मुख्यालया अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक विभागातील एका भागाची महाव्यवस्थापकांकडून वर्षांतून एकदा तपासणी केली जाते. एक प्रकारचे हे ऑडिटच असते. यावेळी बल्लारशाह - सेवाग्राम रेल्वे मार्गावरील ठिकठिकाणच्या कामाचे महाव्यवस्थापक मीना आणि त्यांच्यासोबतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिवसभर ऑडिट केले.
सुरूवात बल्लारशाह येथून झाली. येथील रूट रिले इंटरलॉकिंग (आरआरआय) केबिन आणि पॅनेल रूम. रिले/पॉवर युनिट, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) स्थानकावरील सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, स्टेशन व्यवस्थापकाचे कार्यालय, क्रू लॉबी, क्रू रनिंग रूम, स्थानकावरील पीआरएस काउंटर आणि प्रवाशांच्या विविध सुविधा तपासल्या.
भुयारी मार्ग, त्याची उंची, गुड्स शेड आणि एक्सिडेन्ट रिलिफ ट्रेन (एआरटी) ट्रेन, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे तपासली. यावेळी महाव्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि सुरक्षितता व सतर्कतेबाबत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यमान लोडिंग क्षमता साध्य करण्यासाठी आणि लोडिंग क्षमता वाढवण्याच्या योजनांवर चर्चा करण्यासाठी मालवाहतूक ग्राहकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर स्थानकाची पाहणी करून आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर आडबाले यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी एका बुकलेटचेही त्यांनी प्रकाशन केले.
भांदक- माजरी विभागातील कोंडा पूल. लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक ३२ तपासल्यानंतर मिना यांनी रेल्वे रूळ आणि वेल्डमधील दोष शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अल्ट्रासोनिक दोष शोधक उपकरणांचे प्रदर्शन असलेल्या स्टॉलला भेट दिली. त्यानंतर वरोरा येथे स्टेशन, रेल्वे आरोग्य युनिट आणि कर्मचारी वसाहतीची पाहणी करून आमदार करण संजय देवतळे यांच्याशी चर्चा केली.
या दाैऱ्यात मिना यांनी हिंगणघाट ट्रैक्शन सब स्टेशनचे निरीक्षण करून हिंगणघाट - चितोडा विभागात स्पीड रन टेस्ट घेतली.
नागपुरात अधिकाऱ्यांची बैठक
मिना यांनी सायंकाळी नागपुरात विभागातील वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बैठकीत त्यांनी रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी सुरक्षा, देखभाल, गुणवत्ता आणि प्रशिक्षण (एसएमक्यूटी) या चार मुद्द्यांवर भर देऊन, शाखा अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. यावेळी त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या युनियन प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी मुख्यालयातील प्रधान विभाग प्रमुख, विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल आणि मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला उपस्थित होते.