Balasaheb Thackeray International Zoo will also be the center of the tribal community, assures Uddhav Thackeray | बाळासाहेब ठाकरे अंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आदिवासी समाजाचेही केंद्र  बनेल, उद्धव ठाकरेंचे आश्वासन

बाळासाहेब ठाकरे अंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आदिवासी समाजाचेही केंद्र  बनेल, उद्धव ठाकरेंचे आश्वासन

नागपूर : एक संघ आणि सक्षम महाराष्ट्र घडविताना यापुढे विदर्भाकडे दुर्लक्ष होऊ दिले जाणार नाही. महाविकास आघाडीचे प्रत्येक पाऊल हे विकासाचे असेल, असा शब्द देण्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे आदिवासींच्या संस्कृतीचे केंद्र ठरेल आणि या संस्कृतीचे दर्शन जागतिक पर्यटकांना करून दिले जाईल, असा शब्द दिला.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारीचे उद्घाटन आणि स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय उद्यान असे नामकरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी दुपारी पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री संजय राठोड होते. गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास ठाकरे आमदार आशीष जयस्वाल, आमदार अभिजित वंजारी , आमदार नरेंद्र भोंडेकर,  आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आमदार नितीन देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष  रश्मी बर्वे,  माजी आमदार प्रकाश गजभिये,  वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद मैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव विकास खारगे, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एन. रामबाबू, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एन. वासुदेवन  प्रमुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुपारी 2.45 वाजता विमानाने आगमन झाले. आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात आगमन झाल्यावर त्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर  इंडियन सफारीचा अनुभव घेतला.

समारंभात उद्धव ठाकरे म्हणाले, आमचे आजोळ विदर्भातील म्हणजे परतवाड्यातील आहे. त्यामुळे आमच्या धमण्यात विदर्भाचे रक्त वाहत आहे. विदर्भ बाबतचे प्रेम आम्हाला कोणी शिकवू नये किंवा अपप्रचार देखील करू नये. या क्षणापासून विदर्भाच्या विकासाकडे कसलेही दुर्लक्ष होणार नाही. नागपुरातील या प्राणी संग्रहालया एवढा देशात एकही झू नसावा. नागपुरात सिंगापूर नंतर नाईट सफारी सुरू केली जाणार आहे. टुरिझम ही एक इंडस्ट्रीज आहे. त्या दृष्टीने वनांचा विकास करणे ही आमची प्राथमिकता असेल. सुरजागडचा प्रकल्प देखील लवकरच मार्गी लावायचा आहे. या सरकारबाबत विकासासंदर्भातील गैरसमज जाणून-बुजून पसरवला जात आहे. मात्र गोसेखुर्दच्या पाण्यानेच तो धुवून काढायचा आहे. नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण 1 मे रोजी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

नामकरणाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या विरोधाचा उल्लेख करून ते म्हणाले,  या नामकरणाच्या प्रसंगी कुणीही नाराज होण्याची किंवा अस्वस्थ होण्याचे कारण नाही. आदिवासींची संस्कृती जोपासण्याचे काम या प्रकल्पामध्ये होईल, असा शब्द मी देतो. या प्रकल्पाच्या कामातील पुढील टप्प्यात गोंडवाना थीम पार्क उभारले जाईल. वसईमध्ये तेथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन जसे घडते, तसे दर्शन या प्रकल्पातून जागतिक पर्यटकांना घडविले जाईल. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकारातून मुंबईत उद्घाटन झालेल्या सायबर पोलिस स्टेशनचा आणि तुरूंग पर्यटनाचा देखील त्यांनी उल्लेख केला. देशातील हे पहिले पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री संजय राठोड म्हणाले, मागील दहा वर्षापासून या उद्यानाची फक्त चर्चाच होती. प्रत्यक्षात ते साकारले गेले नाही. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षात येथील  इंडियन सफारीचे उद्घाटन करून दाखविले. विदर्भातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा हा टप्पा असला तरी विरोधक आदिवासी समाज बांधवांना पुढे करून याबाबत नाहक गैरसमज पसरवित आहे. मागील दहा वर्षांच्या नस्ती विरोधकांनी तपासाव्यात. त्यात कुठेही गोंडवन असे नाव देण्याचा उल्लेख नाही. जनतेला पुढे करून विकासासाठी विरोध केल्याने देश पुढे जाणार नाही, अशी कोपरखळी त्यांनी मारली. मंत्री अनिल देशमुख म्हणाले, विदर्भ ही वाघांची राजधानी आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात व्याघ्र प्रकल्पाची आखणी केली. त्यानंतर योजनापूर्वक देशात वाघांची संख्या वाढली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विदर्भप्रेम देखील त्यांनी  विदीत केले.

केंद्र सरकारने अलीकडेच आखलेल्या वनिका या योजनेला राज्य सरकारने परवानगी द्यावी. मेळघाटमधील आदिवासीचे स्थलांतर आणि कुपोषण थांबविण्यासाठी अशा योजनांचा फायदा होईल. राज्य सरकारने दहा कोटी रुपये द्यावे, त्यात 100 कोटी रुपयांची भर वनविभागाचे अधिकारी घालतील, अशी विनंती त्यांनी केली. पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, वन आणि नागरी विकासामध्ये एफडीसीएमची भूमिका मोठी आहे. मुंबईतील आरे प्रकल्पाचा उल्लेख त्यांनी केला. याच धर्तीवर नागपुरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा विकास होत आहे. तो देशात महत्वाचे ठरेल.
 
नागपूर शहराला तीनशे वर्षे पूर्ण झाली असता  एक प्रकल्प तयार करण्यात आला होता. त्यावेळी तीन प्रस्ताव नागपूर सुधार प्रन्यासकडे सुचविले होते. दहा कोटी रुपयांचा निधी देखील दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. गोरेवाडाचे जंगल कळमेश्वरच्या मार्गामुळे विभाजित झाले आहे. त्या ठिकाणी अंडरपास करावा किंवा मोठा ब्रीज उभारला जावा व हे दोन्ही जंगल जोडले जावे, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. परिवहन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, विकास म्हणजे काय हे या सरकारने दाखविले आहे. वन विभागाच्या माध्यमातून प्रथमच कधी नव्हे ती विकासाची कामे एका वर्षभरात पूर्ण झाली. या प्रकल्पामुळे वनराजधानीची सुरुवात नागपूरपासून होईल,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले, शहराच्या भोवतालचे पर्यावरण हे लंग्स ऑफ सिटी असते. या प्रकल्पामुळे केवळ नागपूरच नव्हे तर विदर्भाचे आणि राज्याचे देखील आरोग्य उत्तम राखले जाईल,  या प्रकल्पातून पर्यटनाला नवी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक  एन. वासुदेवन यांनी प्रास्ताविकातून एफडीसीएमची भूमिका आणि विकासाची दिशा मांडली, तर आभार एफडीसीएमचे महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन यांनी मानले.

Web Title: Balasaheb Thackeray International Zoo will also be the center of the tribal community, assures Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.