बॅग विक्रेत्याने लावला शाळेच्या आवारात गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 22:04 IST2021-07-20T22:03:49+5:302021-07-20T22:04:22+5:30
Bag seller hanged himself सीताबर्डीतील एका बॅग विक्रेत्याने भिडे कन्या शाळेच्या आवारात गळफास लावून आत्महत्या केली.

बॅग विक्रेत्याने लावला शाळेच्या आवारात गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सीताबर्डीतील एका बॅग विक्रेत्याने भिडे कन्या शाळेच्या आवारात गळफास लावून आत्महत्या केली. अभिजित कोहळे (वय ३०) असे त्याचे नाव आहे. सोमवारी रात्री ही घटना उघड झाल्यापासून उलटसुलट तर्कवितर्क लावले जात आहेत.
सीताबर्डीच्या मोदी नंबर ३ मध्ये भिडे कन्या शाळा आहे. शाळेची इमारत जुनी झाल्याने ती बंद अवस्थेत आहे. शाळेच्या आवारातील एका खोलीत कोहळे राहत होता. तो तेथून बॅग विक्री करायचा. बाजूच्या खाली जागेत पार्किंगही चालवायचा. सोमवारी रात्री १०.५० च्या सुमारास तो गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. ही माहिती कळताच ठाणेदार अतुल सबनीस, पीएसआय प्रवीण सुरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. कोहळेने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, ते स्पष्ट झाले नाही. त्याने कोणती सुसाईड नोटही लिहून ठेवली नसल्याचे पोलीस सांगतात. दरम्यान, कोहळेच्या आत्महत्येमुळे उलटसुलट तर्कवितर्क लावले जात आहेत. प्रीती अभिजित कोहळे (वय ३०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.