बच्चू कडू रेल्वे रोको आंदोलन करणार नाही; हायकोर्टात दिली ग्वाही
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: October 30, 2025 15:37 IST2025-10-30T15:36:48+5:302025-10-30T15:37:16+5:30
Nagpur : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे मंगळवारच्या सकाळपासून वर्धा रोड बंद झाला होता. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता.

Bachchu Kadu will not protest against railway blockade; gave assurance in the High Court
नागपूर : माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार नाही, अशी ग्वाही गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. न्यायालयाने ही ग्वाही रेकॉर्डवर घेऊन बच्चू कडू यांच्या चांगल्या वागणुकीची प्रशंसा केली. ही वागणूक आदर्श निर्माण करेल, असेही न्यायालय म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे मंगळवारच्या सकाळपासून वर्धा रोड बंद झाला होता. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. परिणामी, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी बुधवारी या अवैध आंदोलनाची गंभीर दखल घेऊन स्वतःच जनहित याचिका दाखल करून घेतली आणि बच्चू कडू व इतर शेतकरी आंदोलकांना शांततेच्या मार्गाने वर्धा रोड रिकामा करण्याचा आदेश दिला. त्यानंतर कडू व इतर आंदोलक रात्री वर्धा रोडवरून हटल्याने वाहतूक सुरळीत सुरू झाली.
पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी गुरुवारी उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करून वर्धा रोडवरील वाहतूक सुरू झाल्याची माहिती दिली. तसेच बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास रेल रोको आंदोलन करणार आहेत, याकडेही लक्ष वेधले. दरम्यान, बच्चू कडू यांनी रेल रोको आंदोलन मागे घेतले आहे, अशी माहिती कडू यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली.