आईपासून पोरकी झालेल्या बालकांना आता पावडरचे नाही, आईचे दूध मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 18:41 IST2025-03-15T18:40:23+5:302025-03-15T18:41:47+5:30
मेडिकलमध्ये मातृ दुग्धपेढी : यंत्रसामग्री, साहित्य आले

Babies who have lost their mothers will now receive breast milk, instead of powdered milk.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जन्माला आल्यानंतर अर्ध्या तासात आईचे दूध मिळणे हे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु आईपासून पोरकी झालेल्या बालकांना नाइलाजाने गाई-म्हशीचे किंवा पावडरचे दूध देण्याची वेळ येते. अशा बालकांसाठी वरदान ठरणारी 'मातृ दुग्धपेढी' आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही (मेडिकल) सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक साहित्य व यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे.
सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयात मातृ दुग्धपेढी सुरू करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने २०१९ मध्ये घेतला. या पेढीला लागणारी जागा व कर्मचारी उपलब्ध करून देण्याचा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नागपूरच्या मेयोसह मेडिकल व डागा रुग्णालयाने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविला. दरम्यानच्या काळात 'राष्ट्रीय हेल्थ मिशन'च्या (एनएचएम) पथकाने निवडक रुग्णालयाची पाहणी केली. यात मेडिकलचाही समावेश होता. उपलब्ध जागा व मनुष्यबळाचे समाधान झाल्याने बालरोग विभागाच्या तीन डॉक्टरांना प्रशिक्षणासाठी मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. परंतु पुढे निधीअभावी हा प्रस्ताव बारगळला.
दरम्यान २०२१ मध्ये डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात (डागा) मातृ दुग्धपेढी स्थापन झाली. याच दरम्यान मेडिकलच्या मातृ दुग्धपेढीला १.३० कोटींना मंजुरी मिळाली. यातून आवश्यक साहित्य व यंत्रसामग्रीची खरेदी करण्यात आली.
३०० लिटर दूध साठविण्याची क्षमता
मेडिकलच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष तिवारी यांनी सांगितले की, 'ह्युमन मिल्क बैंक'साठी निधी उपलब्ध होताच आवश्यक साहित्य व यंत्रसामग्रीची खरेदीला सुरुवात झाली आहे. ही पेढी वॉर्ड क्र. २५ मध्ये स्थापन होईल. जवळपास ३०० लिटर दूध साठविण्याची क्षमता असेल. सहा महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवता येईल. साधारण दोन-तीन महिन्यांत ही पेढी नवजात बालकांच्या सेवेत असणार आहे.
"आईचे दूध नवजात बालकांसाठी अमृतासमान असले तरी काही मातांना विविध कारणांमुळे स्तनपान देणे शक्य होत नाही. अशोवळी गायीचे दूध किंवा दुधाची पावडर देण्याची वेळ येते. ज्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास आणि शारीरिक वाढ मंदावण्याचा धोका असतो. यावर उपाय म्हणून मेडिकलमध्ये 'मातृ दुग्धपेढी' स्थापन केली जात आहे. या पेढीचा लाभयेथील नवजात बालकांना तर होईल बाहेरही दुग्ध पाठविण्याची सोय उभी केली जाईल."
- डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल