‘आयुष्मान’ची गती झाली संथ; ९ लाखावर लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:05 AM2019-08-05T11:05:19+5:302019-08-05T11:05:41+5:30

‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ या माध्यमातून जनतेला ५ लाख रुपयांपर्यंत उपचाराची हमी सरकारने दिली आहे. योजनेला सुरू होऊन वर्ष होत असतानाही योजनेच्या कामाची गती संथ असल्याचे दिसून येत आहे.

'Ayushman' has slowed down | ‘आयुष्मान’ची गती झाली संथ; ९ लाखावर लाभार्थी

‘आयुष्मान’ची गती झाली संथ; ९ लाखावर लाभार्थी

Next
ठळक मुद्दे ७०१२४ लाभार्थ्यांनाच कार्ड वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारने आर्थिक निकष लक्षात घेऊन सामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य सेवेसाठी उपयुक्त पाऊल उचलले आहे. ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ या माध्यमातून जनतेला ५ लाख रुपयांपर्यंत उपचाराची हमी सरकारने दिली आहे. २३ सप्टेंबर २०१८ रोजी योजनेचा शुभारंभ झाला आहे. राज्यातील ८३.७२ लाख कुटुंबांना योजनेचा लाभ होणार असल्याचे सांगितले जाते. नागपूर जिल्ह्यात पात्र लाभार्थ्यांची संख्या ९ लाख २० हजार ९४९ आहेत. यातील ७०१२४ लाभार्थ्यांना योजनेंतर्गत गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले आहे. योजनेला सुरू होऊन वर्ष होत असतानाही योजनेच्या कामाची गती संथ असल्याचे दिसून येत आहे.
२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीवरून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. यात शासकीय रुग्णालयाबरोबरच व खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करुन घेतले आहे.
आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी कॉमन सर्व्हिस सेंटर, ग्रामपंचायतीमध्ये नियुक्त डाटा एन्ट्री आॅपरेटर यांच्याकडे उपलब्ध आहे. या यादीमध्ये नाव असलेल्या लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड तयार करण्यासाठी शिधापत्रिका, प्रधानमंत्र्यांचे स्वाक्षरीचे वितरित करण्यात आलेले पत्र आणि आधारकार्डची आवश्यकता आहे. एखाद्या कुटुंबास प्रधानमंत्र्यांचे स्वाक्षरीचे पत्र वितरित झाले नसेल व त्यांचे नाव लाभार्थी यादीत असेल तर त्यांनी शिधापत्रिका व आधारकार्ड सोबत नेल्यास त्यांच्या नावाची नोंदणी केली जात आहे.
ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर १५ लोकांचे पथक तयार केले. लाभार्थ्यांचे कागदपत्र जमा करुन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून पडताळणी करुन लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.

Web Title: 'Ayushman' has slowed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार