‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
By शुभांगी काळमेघ | Updated: October 3, 2025 15:49 IST2025-10-03T15:49:00+5:302025-10-03T15:49:32+5:30
Nagpur : शहरातील आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद असलेल्या रुग्णालयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, अनेक ठिकाणी अडचणी उघड झाल्या.

'Ayushman Bharat' scheme closed? Shocking reality revealed in Nagpur hospitals; Patients denied services
नागपूर : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेविषयी धक्कादायक वास्तव समोर आले आहे त्यामुळे ही योजना नेमकी चालू आहे की नाही अशे प्रश्न उपस्थित झाले आहेत. योजनेअंतर्गत येणाऱ्या नागपूर शहरातील रुग्णालयांनी रुग्णांना सेवा नाकारल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अनेक रुग्णालयांनी लाभार्थ्यांना "योजना येथे लागू नाही", "मशीन बंद आहे", किंवा "तांत्रिक अडचणी आहेत" अशी कारणे देत उपचार देण्यास नकार दिला, तर काही ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबरच चुकीचे किंवा बंद असल्याचे आढळून आले.
शहरातील आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद असलेल्या रुग्णालयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, अनेक ठिकाणी अडचणी उघड झाल्या. काही रुग्णालयांनी स्पष्टपणे सांगितले की सध्या आयुष्मान भारत योजना येथे लागू नाही, अथवा ती बंद ठेवण्यात आली आहे. सेवा नाकारणाऱ्या रुग्णालयांमध्ये मेडिट्रीना रुग्णालय, नेल्सन रुग्णालय, अवंतिका कार्डिओलॉजी, झेनिथ रुग्णालय येतात.
अनेक रुग्णालयांचे कॉन्टॅक्ट नंबर चुकीचे होते, कालबाह्य होते, किंवा ते क्रमांक कोणत्याही संस्थेशी संबंधित नसल्याचे आढळले. काही क्रमांकांवर "हा क्रमांक अस्तित्वात नाही" असा संदेश ऐकायला मिळाला. यामध्ये दागा मेमोरियल रुग्णालय, जीएमसीएच सुपर स्पेशालिटी, प्रभात रुग्णालय, आयकॉन रुग्णालय , केआरआयएमएस (KRIMS) रुग्णालय, वॉकहार्ट रुग्णालय आहेत.
लता मंगेशकर रुग्णालय, ऑरेंज सिटी रुग्णालय, अॅलेक्सिस रुग्णालय, जीएमसी (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय) या काही रुग्णालयांमध्ये वारंवार कॉल करूनही प्रतिसाद मिळाला नाही. कॉल रिसीव्ह झाले नाहीत किंवा थेट कट केले गेले.
योजनेचा लाभ न मिळू शकलेले काही रुग्णांचे नातेवाईक सांगतात की, "हमी मिळवण्याच्या आशेने रुग्णालयात गेलो, पण त्यांनी पैसे मागितले. योजना आहेच नाही, असे सांगून आमच्याकडून पैसे घेतले." अनेक रुग्णांमध्ये भ्रम निर्माण झाला आहे की ही योजना खरंच चालू आहे की नाही.
तर ऑर्थो रेडियन्स रुग्णालय, माया रुग्णालय, शालिनी मेघे रुग्णालय, भगत रुग्णालय, नॅशनल कॅन्सर रुग्णालय, अनंतवार आय हॉस्पिटल (नेत्र रुग्णालय), आशा रुग्णालय, स्वामी विवेकानंद रुग्णालय या काही रुग्णालयांनी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सेवा देत असल्याचे सांगितले.
ही योजना गरीब व गरजूंना मोफत आरोग्यसेवा देण्यासाठी तयार करण्यात आली असताना, अंमलबजावणीतच त्रुटी असल्याचे दिसते आहे त्यामुळे ही योजना नेमकी चालू आहे कि नाही अशे प्रश्न रुग्णांकडून विचारले जात आहेत.