विश्व में गुंजे हमारी भारती... संघ गीतांतून राष्ट्रभक्तीचा जागर; शंकर महादेवन यांचे गायन
By योगेश पांडे | Updated: September 28, 2025 23:35 IST2025-09-28T23:34:16+5:302025-09-28T23:35:10+5:30
सरसंघचालकांच्या हस्ते संघगीत संग्रहाचे लोकार्पण

विश्व में गुंजे हमारी भारती... संघ गीतांतून राष्ट्रभक्तीचा जागर; शंकर महादेवन यांचे गायन
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त उत्साह असताना स्वयंसेवकांना रविवारी सायंकाळी संघगीतांची अवर्णनीय मेजवानीच मिळाली. संघगीत या संग्रहाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण झाले. प्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन यांच्या स्वरांतील हम करे राष्ट्र आराधन, बलसागर भारत होवो, विश्व में गुंजे हमारी भारती, निर्माणों को पावन युग में यासारख्या गीतांना ऐकून उपस्थित असलेले स्वयंसेवकांचे मन नकळतपणे शाखा मैदान व संघ वर्गातील आठवणींमध्ये गेले.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल सोले हे प्रामुख्याने उपस्थित होते. संगीत आणि शब्द हे भावनेचे वाहक आहेत. उत्तम शब्द थेट हृदयाला भेटतात आणि त्याला संगीताची जोड असल्यास त्याचे ग्रहण अधिक गतिशील त्याने होते. संघ गीतातील शब्दांच्या मागे जीवनाची तपस्या आहे. या गीतांच्या रचनाकरांची नोंद नसली तरीही राष्ट्रभक्तीची भावना समान असते. संघाच्या एका कार्यक्रमाला आल्यावर शंकर महादेवन म्हणाले होते की हा कार्यक्रम म्हणजे एक सरगम आहे असे वाटते. परंतु आज त्यांनी आपल्या सरगमातून संघ उभा केला. संघाकडे भारतातील सर्व भाषांमधील गीत असून त्यांची संख्या सुमारे २५ हजारांच्या वर आहे असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले. शरद केळकर यांनी संचालन केले. तर अनिल सोले यांनी आभार मानले. यावेळी जयप्रकाश गुप्ता, अशोक मानकर, राजेश बागडी, दीपक खिरवडकर हेदेखील उपस्थित होते.
कॉपीराईट नसतानादेखील संघगीते अजरामर : मुख्यमंत्री
संघाच्या गीतांचा कॉपीराईट कधीच कोणी मागितला नाही. स्वयंसेवकांच्या तोंडी असलेली गीते कोणी लिहीले याची माहिती नसते, मात्र तरीदेखील गीत अजरामर झाले आहेत. संघ गीतांमधून सांघिक भावना निर्माण होते व प्रत्येक ओळ प्रेरणा देणारी असते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
गीतांतून संघभाव पोहोचतो मनामनांत : नितीन गडकरी
संघ गीतांमध्ये इतकी शक्ती आहे की त्यांच्या स्वरांनी संघाचा भाव थेट मनामनांपर्यंत पोहोचतो. त्याचा सर्वांच्याच व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम होतो, अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. आगामी खासदार सांस्कृतिक महोत्सवात संपूर्ण संघगीत संग्रहातील २५ गाण्यांचे सादरीकरण करण्यासाठी शंकर महादेवन यांना तसेच सूत्र संचालन करण्यासाठी शरद केळकर यांना निमंत्रण देत असल्याचे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.