विदर्भात डायलिसिससाठी जीवघेणी प्रतीक्षा
By Admin | Updated: December 12, 2015 06:11 IST2015-12-12T06:11:10+5:302015-12-12T06:11:10+5:30
मूत्रपिंडाच्या (किडनी) आजारात जीवनदायी असणाऱ्या नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील केवळ चार डायलिसिस

विदर्भात डायलिसिससाठी जीवघेणी प्रतीक्षा
वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या आदेशालाही खो : केवळ चार मशीन्सवर रुग्णांचा भार
सुमेध वाघमारे ल्ल नागपूर
मूत्रपिंडाच्या (किडनी) आजारात जीवनदायी असणाऱ्या नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील केवळ चार डायलिसिस मशीन्सवर विदर्भासह शेजारच्या राज्यातील रुग्णांचा भार आहे. परिणामी या गंभीर व खर्चिक आजाराशी झगडत असणाऱ्या रुग्णाना जीवघेण्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत आहे किंवा पदरमोड करून खासगी रु ग्णालयातून उपचार घ्यावे लागत आहे.
विशेष म्हणजे, या संदर्भात आमदार सुधाकर कोहळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न रेटून धरला होता. वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी १० डायलिसिस मशीन्स देण्याची ग्वाही दिली होती, तसे लेखी निर्देश वैद्यकीय शिक्षण सचिवांनीही दिले होते, परंतु नऊ महिन्यानंतरही एकही मशीन आलेली नाही.
दोन्ही मूत्रपिंड कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात निकामी झालेल्या रु ग्णाला डायलिसिस करण्याशिवाय पर्याय नसतो. विदर्भात केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ही सोय उपलब्ध आहे. परंतु सुपरमधील डायलिसिस विभागातील नऊपैकी पाच मशीन बंद पडल्या आहेत. केवळ चार मशीनवर विभाग सुरू आहे. या मशीनवर रुग्णांचा भार वाढल्याने रु ग्णांवर दीर्घ प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. यातील अनेक रु ग्णांचे आठवड्यातून दोन तरी दिवस हिमो डायलिसिस करावे लागते. विशेषत: गंभीर रुग्णांना हिमो डायलिसिसशिवाय पर्याय नसतो. खासगी रु ग्णालयात प्रत्येक हिमो डायलिसिसला हजार ते दीड हजार रु पये लागतात. गरीब रु ग्णांना ते परवडत नाही. त्यामुळेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयात डायलिसिससाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र, अपुऱ्या उपकरणांमुळे प्रतीक्षा यादी वाढली आहे. रुग्णांची वाढती संख्या व तत्काळ नव्या डायलिसिस मशीनच्या खरेदीकडे अद्यापही कुणाचेच लक्ष नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
सुपर स्पेशालिटीमध्ये केवळ दहाच जणांचे डायलिसिस
४सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या नेफ्रालॉजीच्या बाह्यरुग्ण विभागात रोज शंभरावर रुग्ण उपचारासाठी येतात. यातील रोज १५-२० रुग्णांना हिमो डायलिसिसची गरज असते. परंतु चारच मशीन सुरू असल्याने यातील दहाच रुग्णांचे डायलिसिस होते. इतर रुग्णांना प्रतीक्षा यादीत टाकले जाते. यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांची किडनी निकामी होऊन त्यांच्या जीवावर बेतत आहे.
मेडिकल, मेयोमधील डायलिसीस बंद
४शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) हिमो डायलिसीसच्या प्रत्येकी एक-एक मशीन आहेत. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून हिमो डायलिसीसच होत नाही. यामुळे रुग्णांना केवळ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा आधार आहे.
दहा डायलिसीस मशीनची घोषणा हवेतच
४गेल्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर सुपर स्पेशालिटीला पाच डायलिसीसच्या मशीन उपलब्ध करून देण्याची घोषणा झाली. परंतु त्यानंतरही मशीन्स मिळाल्या नाहीत. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. कोहळे यांच्यासह भाजपाच्या सहा आमदारांनी तावडे यांना लेखी निवेदन दिले. यात दहा मशीन्स देण्याचे निर्देश त्यांच्या विभागाच्या सचिवांना दिले. परंतु नऊ महिन्यांचा कालावधी होऊनही डायलिसीसच्या मशीनची प्रतीक्षाच आहे.