लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: पारंपारिक सिग्नल प्रणालीला आधुनिकतेचा जोड देऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आता स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम (एबीएस) कार्यान्वित करण्यात आली आहे. नागपूर नजिकच्या खापरी ते गुमगाव दरम्यान या स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग यंत्रणेची यशस्वी अंमलबजावणी सुरू झाली आहे. भारतीय रेल्वेने नवीनीकरणाची कास धरत अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मोठे प्रयत्न चालविले आहेत. त्यानुसार, ही यंत्रणा उच्च घनतेच्या मार्गांवरील सुरक्षा अधिक भक्कम करते. रेल्वे लाइनच्या क्षमतेत यामुळे वाढ होऊन कार्यक्षमतेतही सुधारणा होते.
खापरी–गुमगाव हा नागपूर विभागातील चार महत्त्वाच्या एबीएस प्रकल्पांपैकी दुसरा टप्पा आहे. उर्वरित टप्प्यांमध्ये अजनी–खापरी, नागपूर–गोधनी आणि वर्धा–कवठा या रेल्वे स्थानकादरम्यानच्या लाईनचा समावेश आहे. या टप्प्यांच्या अंमलबजावणीनंतर एकूण ४४.२० किलोमीटर रेल्वेमार्गाला एबीएस तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आले आहे. या सिस्टममुळे केवळ प्रवासीच नव्हे तर मालगाड्यांची वर्दळ सुरळीत करून त्यांच्या जाण्या-येण्याचे व्यवस्थापनही चांगल्या प्रकारे करता येते.
हे होतात फायदे!
पारंपरिक मॅन्युअल सिग्नलिंगच्या तुलनेत स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणालीमुळे रेल्वे मार्ग छोट्या ब्लॉक्समध्ये विभागतात. परिणामी एकाच वेळी अनेक गाड्यांचे सुरक्षित संचालन करणे सोपी जाते. या सिस्टममुळे गाड्यांतील अंतर (हेड-वे) कमी होते. प्रवासी गाड्यांचे संचालन सुरळीत होते आणि त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकाचेही पालन होते. अर्थात गाड्यांच्या लेटलतिफींचा प्रकार यातून टाळणे शक्य होते.