ऑटोचालकाची आत्महत्या, मारहाण करून अपमानित केल्याने उचलले कठोर पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 13:17 IST2021-12-02T10:58:31+5:302021-12-02T13:17:22+5:30
ऑटोचालकाला मारहाण करून नागरिकांसमोर अपमानित केल्यामुळे त्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ऑटोचालकाची आत्महत्या, मारहाण करून अपमानित केल्याने उचलले कठोर पाऊल
नागपूर : बसस्थानकावर एकाने ऑटोचालकाला मारहाण करून नागरिकांसमोर अपमानित केले. या प्रकाराने खचलेल्या ऑटोचालकाने तलावात उडी मारून जीवन संपवले. या प्रकरणी आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मनीष भीमराव वासनिक (३५) रा. दहिकर चौक रामबाग असे मृतकाचे नाव आहे. तर संतोष देवराव रामटेके (३०) रा. सावित्रीबाई फुलेनगर असे आरोपीचे नाव आहे. वासनिक ऑटोचालक होता. २० सप्टेंबरला एसटी बसस्थानकावर त्याचा रामटेकेसोबत वाद झाला होता. रामटेकेने नागरिकांसमोर त्याला मारहाण केली होती. त्याला अपमानित करून पोलिसांना त्याच्याविरुद्ध खोटी माहिती देऊन कारवाई करू असे सांगितले होते.
त्या दिवशी वासनिक घरी जाऊन झोपला. त्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ सप्टेंबरला आपल्या आईला रामटेकेने अपमानित केल्याचे सांगितले. तसेच, तो आत्महत्या करतो असेही आईला सांगत होता. परंतु आईने समजूत घातल्यामुळे तो घरून निघून गेला. त्यानंतर गांधीसागर तलावात त्याने आत्महत्या केली. १२ ऑक्टोबरला पोलिसांना वासनिकचा मृतदेह आढळला. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यात रामटेके विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.