प्रवाशांनो लक्ष द्या; नागपूर रेल्वेस्थानक आज झाले शंभर वर्षाचे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:01 IST2025-01-15T10:59:38+5:302025-01-15T11:01:47+5:30
Nagpur : चारही दिशेने जातात रेल्वे मार्ग; देशातील एकमेव डायमंड क्रॉसिंग नागपुरात

Attention, passengers; Nagpur Railway Station turns 100 years old today!
नागपूर: देशाचा केंद्रबिंदू असलेल्या नागपुरातील रेल्वेस्थानकाला आज १५ जानेवारी रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या शतकातील आठवणींचा साक्षीदार असलेल्या या स्थानकाच्या इमारतीचे उद्घाटन १५ जानेवारी १९२५ रोजी सर फ्रैंक यांच्या हस्ते झाले होते. त्या दिवसापासून कोरोना काळातील प्रवासी वाहतुकीचा अपवाद वगळता रेल्वेची ये जा थांबली नाही. माल व प्रवासी वाहतुकीसह जाहिरातींमधूनही लक्षणीय उत्पन्न देणारे हे स्थानक नागपूरच्या विकासाचे केंद्रबिंदू ठरले आहे. वर्ल्ड क्लास स्टेशन या दर्जाकडे ड्रोप घेत असताना शंभराव्या वाढदिवसानिमित्त एखाद्या सोहळयाच्या आयोजनाचा विसर रेल्वे प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे प्रवाशांनो, आपले स्थानक शंभर वर्षांचे झाले, याची दखल आज तुम्हीच घ्या.
१ रुपयात जमीन, सावनेरचे दगड
नागपूर रेल्वेस्थानकाच्या उभारणीसाठी १९२५ मध्ये खैरागडच्या राजाने ब्रिटिश सरकारला १ रुपयात ३० एकर जमीन विकली, तर या स्थानकाची इमारत सावनेरहून आणलेल्या वाळूच्या दगडापासून बनलेली आहे.
४८७ कोटींचा खर्च 'वर्ल्ड क्लास'साठी
रेल लैंड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी' (आरएलडीए) अंतर्गत नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. त्यासाठी ४८७.७७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, 'वर्ल्ड क्लास' स्थानकासाठी हे काम येत्या डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे
कामांची प्रगती
स्थानकाच्या उत्तरेकडील फूट ओव्हर ब्रिज (एफओबी), दक्षिणेकडील एफओबी आणि एअर कॉनकोर्स, हेरिटेज इमारतीचे काम सुरू आहे. त्यानंतर फलाट आणि छताचे नूतनीकरण सुरू होईल. स्थानकाच्या पश्चिमेला बहुस्तरीय रचना (G 2) सह निर्गमन आणि आगमन प्लाझा, तसेच या प्लाझामध्ये ३ हजार ४२० चौरस मीटरचे तळघर, पार्किंग क्षेत्र अशा अनेक सुविधा प्रस्तावित आहेत.
३०० गाड्या, दोन लाखांवर प्रवासी
१९४० पर्यंत या रेल्वेस्थानकातून फक्त १० गाड्या जात होत्या. सध्या दररोज २४५ मेल/एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या वेगवेगळ्या दिशांनी धावतात. त्यामध्ये २२ गाड्या या स्थानकावरून निघतात व संपतात. आणि अंदाजे १ लाख ८५ हजार प्रवासी ये-जा करतात.