Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन नागपुरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान झालं आहे. हिंसाचार करणाऱ्या अनेक वाहनांची तोडफोड करुन ती पेटवून दिली होती. त्यामुळे प्रशासनाला अतिरिक्त फौजफाटा तैनात करावा लागला. यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. मात्र आता या सगळ्या प्रकारादरम्यान महिलापोलिसाचा विनयभंग (Assault) करण्यात आल्याचे समोर आलं. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन नागपुरात सोमवारी रात्री हिंसाचार झाला. त्यामुळे नागपुरात सध्या तणावाचं वातावरण आहे. या हिंसाचारादरम्यान, समाजकंटकांकडून पोलिसांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आलं. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, या हिंसाचारादरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. अंधाराचा फायदा घेत आरोपींनी इतर महिला पोलिसांनाही शिवीगाळ करत अश्लील शेरेबाजी केली.
नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ४६ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील काही आरोपींनी चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर महिला पोलिसासोबत संतापजनक प्रकार घडला. हिंसाचारातील आरोपींनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला स्पर्श करुन वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही महिला पोलिसांना जमावातील काही लोकांनी शिवीगाळ देखील केली.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, नागपूर हिंसाचाराच्या घटनेत गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेदरम्यान, एका आरोपीने आरसीपी पथकातील कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या गणवेशाला आणि शरीराला चुकीच्या प्रकारे स्पर्श केला. आरोपीने काही महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी अश्लील हावभाव केले आणि गैरवर्तन केले, असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.