गायीचे बछडे चोरण्यास विरोध केल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
By दयानंद पाईकराव | Updated: August 16, 2023 14:21 IST2023-08-16T14:20:23+5:302023-08-16T14:21:23+5:30
गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

गायीचे बछडे चोरण्यास विरोध केल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
नागपूर : गायीचे बछडे चोरी करून नेणाऱ्या आरोपींना विरोध केल्यामुळे विरोध करणाऱ्याच्या अंंगावर कार नेऊन गंभीर जखमी केले. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी १२ ऑगस्टला रात्री तीन वाजताच्या सुमारास घडली.
मनोज शिवबहादुर सिंग ठाकूर (वय ३४, रा. गोधणी रेल्वे स्टेशनजवळ) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी रात्री त्यांना एकतानगर प्राथमिक शाळेजवळ, बोरगाव चौकाकडे जाणाऱ्या रोडवर टाटा इंडिगो एल. एस. कंपनीच्या गाडीत वाहनचालक व त्याचे तीन साथीदार गायीचे बछडे चोरून नेताना दिसले. त्यांनी आपली दुचाकी आरोपींच्या कारमागे लाऊन त्यांना हटकले. त्यावर आरोपींनी मनोज यांना अश्लील शिविगाळ केली.
कार चालकाने त्याची कार जोरात रिव्हर्स घेऊन मनोज यांच्या अंगावर नेऊन त्यांना गंभीर जखमी करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दुचाकीचे नुकसान करून आरोपी पळून गेले. मनोज यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०७, ३७९, २७९, ३३७, ३३८, २९४, ५०६, ४२७ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.