किरकोळ वादातून जिवंत पेटविण्याचा प्रयत्न : मध्यरात्री नागपुरातील गांधीबागेत थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 23:43 IST2021-06-05T23:42:50+5:302021-06-05T23:43:16+5:30
Attempt to murder किरकोळ वादातून एकाने तिघांना जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. यात एक गंभीररीत्या भाजला तर दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.

किरकोळ वादातून जिवंत पेटविण्याचा प्रयत्न : मध्यरात्री नागपुरातील गांधीबागेत थरार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - किरकोळ वादातून एकाने तिघांना जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. यात एक गंभीररीत्या भाजला तर दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.
विजय रामकृष्ण फाटे (वय २८) असे गंभीररीत्या भाजलेल्या तरुणाचे नाव आहे. विजय बेला (उमरेड) येथील रहिवासी आहे. तो इतवारी गांधीबागमधील ठिय्यावर रोज मजुरी करतो. रात्री तीन नल चाैकात इतर मजुरांसोबत फूटपाथवर झोपतो. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री पिणे-खाणे झाल्यानंतर विजय, त्याचा मित्र सचिन गोपाळराव इंगळे (वय २६) आणि बारिक नामक तरुण तिघेही जागनाथ बुधवारी जवळच्या सुलभ शाैचालयाजवळ ओट्यावर झोपले. हिमालय नामक आरोपी मध्यरात्री त्यांच्याजवळ आला. त्याने विजय तसेच सचिनच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि आगपेटीची काडी उगाळून पळून गेला. त्यामुळे आग लागून विजय गंभीररीत्या भाजला तर सचिनचा हात भाजला. बारिक मात्र बचावला. विजय आणि सचिनची आरडाओरड ऐकून बाजूला झोपलेले मजूर जागे झाले. त्यांनी तहसील पोलिसांना कळविले. पोलीस उपनिरीक्षक बाळू राठोड यांनी विजयचे बयान नोंदवून हिमालय नामक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.
जुन्या वादातून घडली घटना
एक महिन्यापूर्वी विजय आणि हिमालयचा वाद झाला होता. त्यावेळी हाणामारीही झाली होती. तेव्हापासून यांच्यात कुरबुरी सुरू होत्या. त्यातून ही घटना घडल्याचे सांगितले जाते.