अर्बन बँकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: November 17, 2016 03:07 IST2016-11-17T03:07:16+5:302016-11-17T03:07:16+5:30
बहुतांश नागरी अर्बन बँकांना रिझर्व्ह बँक आणि ‘करन्सी चेस्ट’ बँकांतर्फे नव्या नोटांचा अत्यल्प पुरवठा होत आहे.

अर्बन बँकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न
रिझर्व्ह बँकेतर्फे नोटांचा अपुरा पुरवठा : पुढील आठवड्यात स्थिती पूर्ववत होणार
नागपूर : बहुतांश नागरी अर्बन बँकांना रिझर्व्ह बँक आणि ‘करन्सी चेस्ट’ बँकांतर्फे नव्या नोटांचा अत्यल्प पुरवठा होत आहे. त्यामुळे या बँकांमध्ये खातेदार आणि नागरिकांना जुन्याच्या बदल्यात नवीन नोटा देण्याची प्रक्रिया बुधवारी बंद होती. हा प्रकार म्हणजे अर्बन बँकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न असून, रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणेच नागरी अर्बन बँकांनाही नवीन नोटा उपलब्ध करून देण्याची व्यवस्थापनाची मागणी आहे. लहान चलनी नोटांअभावी विविध बाजारपेठांमध्ये व्यवसायावर परिणाम झाला आहे.
रिझर्व्ह बँकेने जुन्या नोटा स्वीकारणे बंद केल्यामुळे जुन्या नोटांनी तिजोरी भरलेल्या नागरी बँकांनी बुधवारी जुन्या नोटा स्वीकारल्या नाही. रिझर्व्ह बँकेने नवीन नोटांचा पुरवठा करावा, अशी मागणी करताना नागरी बँकांच्या व्यवस्थापकांनी पुढील आठवड्यात स्थिती सामान्य होईल, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)
रिझर्व्ह बँकेने नोटांचा पुरवठा करावा
निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-आॅपरेटिव्ह पतसंस्थेचे संस्थापक सचिव प्रमोद मानमोडे यांनी सांगितले की, निर्मल उज्ज्वल बँकेचे खाते महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेत आहे. त्या बँकेला स्टेट बँकेकडून रविवारपासून नवीन नोटा न मिळाल्यामुळे आम्हाला खातेदारांना वाटप करण्यासाठी नोटा मिळाल्या नाहीत, शिवाय राज्य बँकेने जुन्या नोटा स्वीकारणे बंद केले आहे. त्या कारणामुळे आम्ही बुधवारी जुन्या नोटा स्वीकारल्या नाहीत. ५० आणि १०० रुपयांच्या नोटा चलनात कमी प्रमाणात असल्यामुळे लहान व्यावसायिक, हॉटेल, भाजीविक्रेते, हातठेले आदींचे व्यवसाय ठप्प आहेत. डॉक्टर व मेडिकल दुकानदार जुन्या नोटा घेत नाही. त्याच कारणामुळे सक्करदरा तिरंगा चौकातील एका हॉस्पिटलमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. नवीन नोटा वाटपाची साखळी खराब झाली आहे. रिझर्व्ह बँकेने नवीन नोटांचा पुरवठा करावा, अशी मागणी आहे.
राज्य बँकेत जुन्या नोटांनी भरली तिजोरी
स्टेट बँक आॅफ इंडिया ही महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेची ‘करन्सी चेस्ट’ बँक आहे. राज्य बँक खातेदार असलेल्या किंवा नसलेल्या नागरी बँकांकडून जुन्या नोटा स्वीकारत आहे आणि त्यांना नव्या नोटा देत आहे. बँकेच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी सांगितले की, स्टेट बँकेकडून आम्हाला १० ते १२ नोव्हेंबर या तीन दिवसात ४५ कोटी मिळाले. ही रक्कम नागरी बँकांना देण्यात आली आणि बँकेच्या ११ शाखांच्या माध्यमातून जुन्या नोटांच्या बदल्यात ग्राहकांना देण्यात आली. पण १३ आणि १५ नोव्हेंबरला नवीन नोटा मिळाल्याच नाही. बुधवारी पाच कोटी रुपये मिळाले. ही रक्कम सात-आठ नागरी अर्बन बँकांना देण्यात येईल. राज्य बँकेत जवळपास ३० कोटींच्या जुन्या नोटा आहेत. या नोटांनी दोन्ही तिजोरी भरल्या आहेत. स्टेट बँकेने जुन्या नोटा स्वीकारणे बंद केले आहे. आमच्याकडील तिजोऱ्या आधीच जुन्या नोटांनी भरल्या असल्यामुळे तुमची रक्कम स्वीकारू शकत नाही, असे स्टेट बँकेने म्हटले आहे. नागरी अर्बन बँकांकडेही जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात जमा असून, त्या राज्य बँक किंवा ‘करन्सी चेस्ट’ बँकेने स्वीकारणे बंद केले आहे.
नागपूर नागरिक बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी सांगितले की, सहा दिवसात बँकेकडे जवळपास ७० कोटींच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. याउलट रिझर्व्ह बँकेकडून मिळालेल्या ८ कोटी रुपयांच्या नोटा ४५ शाखांच्या माध्यमातून बदलवून दिल्या आहेत. रिझर्व्ह बँकेकडे ५० कोटींची मागणी केली आहे. लोकांचीही मागणी जास्त आहे. त्या तुलनेत नवीन नोटा मिळत नसल्यामुळे ग्राहकांची समजूत घालण्यात येत आहे. बँकेत जमा झालेल्या जुन्या नोटा अॅक्सिस बँक या करन्सी चेस्ट बँकेकडे जमा कराव्या लागतात. पण त्यांच्याकडेही जुन्या नोटा पडून असल्यामुळे त्या स्वीकारत नाहीत. त्यामुळे बँकेत ७० कोटींच्या नोटा बिनाव्याजी पडून आहेत. कर्मचारीही परिश्रम घेत आहेत. पुढील दोन दिवसात ५०० च्या नोटा आल्यानंतर स्थिती पूर्ववत होईल.