नागपुरात जुन्या वादातून एकमेकांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 19:27 IST2020-10-12T19:22:58+5:302020-10-12T19:27:39+5:30
Assault, Crime News, Nagpur सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री जुन्या वादातून वस्तीतील तरुणांचे दोन गट आपसात भिडले. त्यांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला चढवला. यात दोघांना गंभीर दुखापत झाली. दोन्हीकडून नंतर पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यात आल्या.

नागपुरात जुन्या वादातून एकमेकांवर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री जुन्या वादातून वस्तीतील तरुणांचे दोन गट आपसात भिडले. त्यांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला चढवला. यात दोघांना गंभीर दुखापत झाली. दोन्हीकडून नंतर पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यात आल्या.
फ्रान्सिस जॉन नायडू (वय २७) हा खलाशी लाईन, मोहननगरात राहतो. त्याचा वस्तीतीलच नीरज ऊर्फ निंजा रामआसरे शाहू सोबत वाद आहे. फिर्यादी फ्रान्सिस आणि त्याचा मित्र नवीन देवचंद भैसवारे हे दोघे रविवारी रात्री १०.३० ला घरासमोर बोलत उभे होते. आरोपी नीरज शाहू तेथे आला. त्याने फ्रान्सिस आणि नवीनकडे रागावून पाहिले. त्यामुळे फ्रान्सिसने त्याला हटकले. कशाला रागाने बघतो, अशी विचारणा केली. त्यामुळे त्यांच्यात वाद वाढला. आरोपी नीरजने स्वतःजवळचा चाकू काढून नवीन भैसवारे याच्या चेहऱ्यावर, पोटावर आणि पाठीवर मारून त्याला गंभीर जखमी केले. मित्रांवर हल्ला झाल्याचे पाहून नवीनच्या मदतीला फ्रान्सिस, गोलू वडर, रोशन आणि योगी भैसवारे धावले. त्यांनी नवीन शाहूला बेदम मारहाण केली. दगडाने ठेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शाहूसुद्धा जबर जखमी झाला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी वाद सोडवला. त्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.
परिसरातील वातावरण गरम
या घटनेमुळे परिसरात वातावरण गरम झाले. माहिती कळताच सदर पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी फ्रान्सिसच्या तक्रारीवरुन नीरज शाहू विरुद्ध तर नीरजच्या तक्रारीवरून फ्रान्सिस, नवीन, गोलू, रोशन आणि योगी यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.