आयटी कंपनीच्या सहायक व्यवस्थापकाची सहकाऱ्यांकडूनच हत्या

By योगेश पांडे | Published: February 21, 2024 09:37 PM2024-02-21T21:37:23+5:302024-02-21T21:37:41+5:30

बॉसिंगला कंटाळून चाकू भोसकून घेतला जीव : अपघाताचा केला होता बनाव, चौकशीतून सत्य उघडकीस

assistant manager of an IT company killed by his colleagues | आयटी कंपनीच्या सहायक व्यवस्थापकाची सहकाऱ्यांकडूनच हत्या

आयटी कंपनीच्या सहायक व्यवस्थापकाची सहकाऱ्यांकडूनच हत्या

नागपूर: आयटी कंपनीतील एका सहायक व्यवस्थापकाची त्याच्याच सहकाऱ्यांनी चाकूने भोसकून हत्या केली. कंपनीतील त्याच्या बॉसिंगला कंटाळून त्यांही हे पाऊल उचलले. सुरुवातीला आरोपींनी त्याचा अपघात झाल्याचा बनाव केला. मात्र चौकशीतून सत्य उघडकीस आले. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली.

एल देवनाथन उर्फ एन.आर.लक्ष्मीनरसिंहम (४१, फरीदाबाद, हरयाणा) असे मृतकाचे नाव आहे. ते मिहान येथील हेक्सावेअर टेक्नॉलॉजी येथे १० महिन्यांपासून सहायक व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. ते मनिषनगरातील अग्निरथ संकुल येथे राहत होते. त्यांच्या कंपनीत गौरव भीमसेन चंदेल (३२, बैतुल, मध्यप्रदेश) व पवन अनिल गुप्ता (हलवाई) (२८, अनुपपूर, मध्यप्रदेश) हेदेखील काम करत होते. त्यातील पवन हा देवनाथन यांचा रूम पार्टनरदेखील होता. दोघेही कामात अनेकदा चुका करायचे व वरिष्ठ असल्यामुळे देवनाथन त्यांना रागवायचे. यामुळे दोन्ही आरोपींना अपमानित वाटत होते.

देवनाथन बॉसिंग करतो अशी त्यांची धारणा झाली होती. तिघेही बऱ्याचदा देवनाथन व पवनच्या रूमवर पार्टी करायचे. सोमवारी मध्यरात्रीदेखील तिघे पार्टीला बसले. कामात होणाऱ्या चुका मी सहन करणार नाही. यानंतर चुका झाल्यानंतर नोकरीवरून काढून टाकेल’ अशी देवनाथनने म्हटल्यावर दोघेही संतापले. दारूच्या नशेत त्यांनी देवनाथनच्या छातीत चाकू भोसकला. त्यात देवनाथन बेशुद्ध झाले. हे पाहून दोघांचीही नशा उतरली व आपल्या हातून काय घडले याची जाणीव झाली. त्यांनी देवनाथन खाली पडल्याची बतावणी केली व छातीला पट्टी बांधून दवाखान्यात घेऊन गेले. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.

या प्रकाराची माहिती देवनाथन यांचे वडील एन.आर.लक्ष्मी नरसिंहम (६८) व लहान भाऊ एल .देवराजन (३७, फरीदाबाद, हरयाणा) यांना देण्यात आली. पोलिसांना या प्रकरणात संशय आलाच होता. आरोपींची झाडाझडती घेतली असता त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणात दोघांविरोधातही गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

दारूच्या नशेत चाकूवर पडल्याने जखमी झाल्याची बतावणी
दारूच्या नशेत देवनाथन हे बाथरूमला गेले व येताना पाय घसरून चाकूवर पडले अशी बतावणी दोन्ही आरोपींनी केली होती. मात्र पोलिसांनी त्यांचे वेगवेगळे बयाण घेतले. त्यात तफावत आढळली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. त्यांना कठोर शब्दांत विचारणा केल्यावर त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. या घटनेमुळे संबंधित कंपनीतील सहकाऱ्यांनादेखील मोठा धक्का बसला आहे.

Web Title: assistant manager of an IT company killed by his colleagues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.